जालना जिल्ह्यात कोरोनाचे नवीन एकवीस रुग्ण 

महेश गायकवाड
Friday, 5 June 2020

शहरातील लक्ष्मीनारायणपुरा येथील कोरोनाबाधित ५८ वर्षीय महिलेचा गुरुवारी (ता. चार) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पंधरा रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले; तसेच जिल्ह्यात नव्याने २१ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १७४ झाली आहे. 

जालना -  शहरातील लक्ष्मीनारायणपुरा येथील कोरोनाबाधित ५८ वर्षीय महिलेचा गुरुवारी (ता. चार) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पंधरा रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले; तसेच जिल्ह्यात नव्याने २१ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १७४ झाली आहे. 

कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. यात मंठा तालुक्यातील नानसी येथील आठ, मंठ्याच्या मॉडेल स्कूल येथे विलगीकरण कक्षात भरती असलेल्या केंधळी येथील तेरावर्षीय मुलगी व २६ वर्षीय पुरुष, वैद्य वडगाव येथील ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर उर्वरित रुग्णांमध्ये जालना शहरातील मोदीखाना येथील सात व मंगळबाजार भागातील एक, शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील एक आणि जालना तालुक्यातील जामवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा :   कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

दरम्यान, पंधरा कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांच्या सलग दुसऱ्या स्‍वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यात जालना तालुक्यातील आठ, बदनापूर येथील एक, जाफराबाद येथील दोन व अंबड येथील चार जणांचा समावेश आहे. 
कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बळी गेले असतानाच गुरुवारी जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

यापूर्वी परतूर तालुक्यातील मापेगाव येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीसह जालना शहरातील मोदीखाना भागातील ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. लक्ष्मीनारायणपुरा भागातील महिला सोमवारी (ता. एक) अत्यवस्‍थ स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तिच्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल मंगळवारी (ता. दोन) कोरोना पॉझिटिव्ह आला होता. ही महिला मधुमेह, रक्तदाब व हृदयाच्या आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली आहे. 

  • जालना कोरोना मीटर 
  • एकूण बाधित : १७४ 
  • बरे झाले : ७१ 
  • उपचार सुरू : १०० 
  • मृत्यू  :  ३ 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna