जालना कोरोना स्कोअर : 309/8 

महेश गायकवाड
Wednesday, 17 June 2020

जिल्ह्यात कोरोना थांबायचं नाव घेत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. १६) दिवसभरात पुन्हा अठरा संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ३०९ झाला आहे, तर आतापर्यंत आठजणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत.

जालना - जिल्ह्यात कोरोना थांबायचं नाव घेत नसल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. १६) दिवसभरात पुन्हा अठरा संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ३०९ झाला आहे, तर आतापर्यंत आठजणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील चौदा रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

आरोग्य विभागाला १८ संशयितांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली असून, यात जालना शहरातील गुड्ला गल्ली भागातील ४, संभाजीनगरमधील १, कादराबादमधील ३, राज्य राखीव दलातील दोन जवान, बालाजीनगरमधील १, शहरातील गोल मशीद परिसरातील १, खरपुडी (ता. जालना) येथील १, जाफराबाद शहरातील नगरपंचायत परिसर व आंबेडकरनगर परिसरात प्रत्येकी एक व भोकरदन शहरातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. 

हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल

भोकरदन शहरात तीन दिवसांपूर्वी कुरेशी मोहल्ला भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकटच्या संपर्कात आल्यामुळे तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे. 
दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या बाधितांपैकी चौदा रुग्ण मंगळवारी बरे झाले आहेत. त्यांच्या सलग दुसऱ्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी सांगितले आहे. या चौदा रुग्णामध्ये घनसावंगी तालुक्यातील यावलपिंप्री येथील दोन, राजेगाव येथील दोन, पांगरा येथील तीन, पारडगाव येथील एक, मंठा तालुक्यातील नानसी व आकणी येथील प्रत्येकी दोन, जालना शहरातील कादराबाद व बालाजी गल्लीतील अफसा मशीद भागातील एका व्यक्तीचा समावेश आहे. 

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

नव्याने वाढ झालेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३०९ झाली असून, त्यापैकी १८५ रुग्ण बरे झाले आहेत. तर आठजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या १०८ रुग्णांवर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, आठ रुग्णांना औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये संदर्भीत करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात ४४१ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ४४१ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. जालना शहरातील संत रामदास वसतिगृहात ३९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २३, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ३६, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३८, पोलिस प्रशिक्षण केंद्रात १९१, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात ८, पंचकृष्ण मंगल कार्यालयात ११ व्यक्ती अलगीकरणात आहे. अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात ४२ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ८, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २ व अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये २३, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १४ व भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ६ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna