कोरोनाने पुन्हा ४० बाधित, त्यातील ३९ जालन्याचे

महेश गायकवाड
Saturday, 27 June 2020

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.  शुक्रवारी (ता. २६) तब्बल चाळीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यातील ३९ रुग्ण जालना शहराच्या विविध भागांतील आहेत.

जालना - शहरात रोज वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. गुरुवारी (ता. २५) नऊ रुग्णांची भर पडल्यानंतर शुक्रवारी (ता. २६) तब्बल चाळीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यातील ३९ रुग्ण जालना शहराच्या विविध भागांतील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील चौदा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला, तरी त्यांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. कोविड हॉस्पिटलमधील दहा रुग्णांनी गुरुवारी कोरोनावर मात केली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा चौदा रुग्णांच्या सलग दुसऱ्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील गुडलागल्ली, नानक निवास, कोष्टी गल्ली व कादराबाद येथील प्रत्येकी एक, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील दोन, राज्य राखीव दलातील सात जवान व भोकरदन शहरातील कुरेशी मोहल्ला भागातील एका व्यक्तीचा समावेश आहे. 

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात तब्बल चाळीस रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जालना शहराला धक्का बसला आहे. या रुग्णांमध्ये नळगल्ली, सदरबाजार, खडकपुरा, कृष्णकुंज परिसर, कडबी मंडी, कोष्टी गल्ली, आनंदनगर व हकीम मोहल्ल्यात प्रत्येकी एक, राज्य राखीव दलातील सहा जवान, कन्हैयानगर, नाथबाबा गल्ली, दाना बाजार, जुना जालना भागात प्रत्येकी दोन, मंगळबाजार भागातील पाच, गुडलागल्लीतील पाच, श्री कॉलनीतील सात व वाटूर फाटा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

वाढलेल्या या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४४७ झाली असून, त्यापैकी ३०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात १३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. 

जिल्ह्यात २७० व्यक्तींचे संस्‍थात्‍मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण २७० व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रांत १४, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात १४, संत रामदास वसतिगृहात २६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १३, मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३७, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ६०, परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये ५, अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १ व शासकीय मुलींच्या वसतिगृहात ९ व्यक्ती अलगीकरणात आहेत. बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १, भोकरदन येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात ५ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये १६, जाफराबाद शहरातील हिंदुस्थान मंगल कार्यालयात ९, टेंभुर्णी येथील जे.बी.के. विद्यालयात २८ व इबीके विद्यालयात ३० व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna