जागे व्हा जालनेकर, आकडा गेला पाचशेवर 

महेश गायकवाड
Monday, 29 June 2020

लॉकडाउन शिथिल केल्यानंतर गेल्या आठवड्यापासून जालना शहरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरवासीयांनी गाफिल न राहता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रविवारी (ता. २८) जिल्ह्यातील ४३ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात ४१ रुग्ण हे जालना शहरातील विविध भागांतील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

जालना - लॉकडाउन शिथिल केल्यानंतर गेल्या आठवड्यापासून जालना शहरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरवासीयांनी गाफिल न राहता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रविवारी (ता. २८) जिल्ह्यातील ४३ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात ४१ रुग्ण हे जालना शहरातील विविध भागांतील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील १९ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनापासून बचावासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

गेल्या आठवड्यापासून जालना शहरातील कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आहे. दोन दिवसांत ५५ रुग्ण आढळल्यानंतर रविवारी तब्बल ४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यात सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरातील आहेत. यामध्ये शहरातील नळगल्ली, संजोगनगर, क्रांतीनगर, यशोधरानगर, अंबड रोड परिसर, सत्यनारायण चाळ, योगेशनगर, मस्‍तगड येथील प्रत्येकी एक, खडकपुरा भागातील पाच, मंगळ बाजारमधील दोन, रहेमानगंज भागातील सोळा, दानाबाजारमधील दहा, जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील एक व भारज (ता. जाफराबाद) येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल

दरम्यान, कोविड हॉस्‍पिटलमधील १९ रुग्णांवर यशस्‍वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले असून, त्यांना सुटी देण्यात आली आहे. बरे झालेल्यांमध्ये जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा, समर्थनगर, संभाजीनगर येथील प्रत्येकी दोन, रामनगर विणकर कॉलनी, नरिमननगर, रहेमानगंज येथील प्रत्येकी एक, आनंदनगरमधील व खडकपुरा येथील प्रत्येकी तीन आणि लक्कडकोट येथील चार व्यक्तींचा समावेश आहे. रविवारी वाढलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५०५ झाली असून, त्यापैकी ३३६ जण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत तेरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna