जालन्यात कोरोनाबाधितांचे नव्याने अर्धशतक 

उमेश वाघमारे 
Wednesday, 15 July 2020

मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. १४) तीनजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, शिवाय कोरोनाबाधितांमध्ये ५२ रुग्णांची भर पडली आहे.

जालना -  मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता. १४) तीनजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, शिवाय कोरोनाबाधितांमध्ये ५२ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, ३७ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा विळखा वाढला असल्याचे चित्र आहे. या कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ४५ जणांचे बळी गेले आहेत. यात मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू असलेल्या शहरातील नूतन वसाहत येथील ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने ता. १० जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला; तसेच शहरातील पेन्शनपुरा परिसरातील ६५ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब व न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने ता. १० जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. तर तालुक्यातील बाजीउम्रद येथील ६५ वर्षीय महिलेचाही सोमवारी (ता. १३) रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना ता. सहा जुलै रोजी श्वसनाचा, फुप्फुसाच्या आजारासह न्यूमोनिया झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

दरम्यान, ५२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहेत. तर ७०४ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ३१६ जणांवर उपचार सुरू असून, ३४ जणांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहे. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

कोरोनाबाधितांवर उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही अधिक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ७०४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यात मंगळवारी (ता. १४) ३७ जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये शहरातील मामा चौक परिसरातील १४ जण, मिशन हॉस्पिटल परिसरातील सातजण, शिवनगर येथील तीनजण, मनीषानगर, जांगडानगर येथील प्रत्येकी दोनजण, सुवर्णकारनगर, नळगल्ली, सामान्य रुग्णालय परिसर, सहयोगनगर, मुलींचे वसतिगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, अंबड तालुक्यातील चुर्मापुरी, देऊळगावराजा येथील सिनगाव जहांगीर येथील प्रत्येक एकजण मंगळवारी (ता. १४) कोरोनामुक्त झाला आहे. 

जिल्ह्यात ४८५ जण अलगीकरणात 

जालना जिल्ह्यातील ४८५ जणांना मंगळवारी (ता. १४) संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यात शहातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३०, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ३४, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५३, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे ९७, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे १०७, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे ५४, परतूर येथील केजीबीव्ही येथे सात, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे आठ, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १०, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३२, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १०, घनसवांगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सहा, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे ११, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे दोन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सहा, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे तीन, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे पाचजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna