जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दोनहजार पार 

उमेश वाघमारे 
Wednesday, 29 July 2020

मराठवाड्यात जालना जिल्हा कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जालना शहरासह जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. २८) एकूण दोन हजार ५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात नव्याने ७४ कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.

जालना -  मराठवाड्यात जालना जिल्हा कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जालना शहरासह जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. २८) एकूण दोन हजार ५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात नव्याने ७४ कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंगळवारी ६५ कोरोनाग्रस्त रुग्ण हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत तब्बल एक हजार ३२७ जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. 

जालना शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे. प्रत्येक दिवशी शहरात कोरोना रुग्णवाढ सुरू आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातही कोरोनाने आपले पाय पसरविण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी ७४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात ८ जण हे अँटीजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही कमी होण्यास तयार नाही. सोमवारी (ता. २७) कन्हैयानगर परिसरातील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने ६४ बळी घेतले आहेत. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, मंगळवारी ६५ कोरोनाग्रस्त उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये दानाबाजार येथील नऊ, सदरबाजार येथील आठजण, गोपीकिशननगर व दुखीनगर येथील प्रत्येकी चारजण, भराडखेडा, गुडलागल्ली, पांगारकरनगर व मस्तगड येथील प्रत्येकी तीन, प्रशांतीनगर व टेंभुर्णी येथील प्रत्येकी दोन, रुख्मिणीनगर, रामनगर, जेईएस महाविद्यालय परिसर, अंबर हॉटेल परिसर, आरपी रोड, क्रांतीनगर, हकीम मोहल्ला, रोशनगेट औरंगाबाद, सुदर्शननगर, नाथबाबा गल्ली, लक्कडकोट, अकोला, लक्ष्मीनगर, साईनगर, कसबा, वसुंधरानगर, अर्चनानगर व लक्ष्मीनारायणपुरा येथील प्रत्येकी एकजण व जालना शहरातील अन्य भागातील सहाजण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ३२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६६५ जणांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात ५४४ जण संस्‍थात्‍मक अलगीकरणात 

जिल्ह्यात ५४४ जणांना मंगळवारी (ता. २८) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे सहा, वन प्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १३, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ४२, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह येथे ४७, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे २०, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५३, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे १७, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे ६०, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स बी ब्लॉक येथे १०२, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे २५, गुरुगणेश भवन येथे १३, पार्थ सैनिक स्कूल येथे आठ, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे पाच, केजीबीव्ही येथे दोन, मंठा मॉडेल स्कूल येथे २०, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात येथे ४६, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे १५, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे २३, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे दोन, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे १२, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे आठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ११, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे एक, आयटीआय कॉलेज येथे आठ, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे पाचजणांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna