Corona Vaccine: कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात शंभरावर केंद्र; साडेदहा हजार जणांची कोव्हिड ॲपमध्ये नोंद

उमेश वाघमारे 
Monday, 4 January 2021

पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, शासकीय व खासगी रुग्णालयाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका आदी सुमारे साडेदहा हजार जणांची कोव्हिन ॲपमध्ये नोंद करण्यात आली आहे

जालना : ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपत्कालीन वापरासाठी कोरोनाच्या सीरमच्या कोविशिल्डसह भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरण करण्यासाठी तब्बल शंभरावर केंद्राचे सध्या नियोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी रविवारी (ता.तीन) दिली. दरम्यान, जिल्ह्यातील साडेदहा हजार जणांची कोव्हिन ॲपमध्ये आतापर्यंत नोंद करण्यात आली आहे.

शरद पवारांनी दिली संदीप क्षीरसागर यांना 'लिफ्ट'

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग, प्रशासकीय यंत्रणा गेल्या मार्च महिन्यांपासून दिवसरात्र परिश्रम घेत आहे. दरम्यान, कोरोना लशीला आपत्कालीन वापरास उपलब्ध होण्याची शक्यता गृहीत धरत जिल्हा प्रशासनाला कोरोना लसीकरणासाठी पूर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात सरकारी व खासगी डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, शासकीय व खासगी रुग्णालयाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका आदी सुमारे साडेदहा हजार जणांची कोव्हिन ॲपमध्ये नोंद करण्यात आली आहे. शनिवारी (ता.दोन) मार्गदर्शन सूचनांचे पालन करत कोरोना लसीकरण कसे करावे, याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये रंगीत तालीम जिल्हा कोव्हिड रुग्णालय येथे पार पडली.

दीड लाख लोकांच्या टेस्ट, लातूर जिल्ह्यात दहा महिन्यांत कोरोनाचे २३ हजार रुग्ण

तसेच अंबड येथील उपजिल्हा रुग्णालय व शेलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही कोरोना लसीकरण ड्राय रन झाले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाने केली. याबाबत डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका आदींना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

त्यामुळे शासनाकडून पहिल्या टप्प्यासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर जिल्ह्यात एका केंद्रावर प्रतिदिन कोव्हिन ॲपमध्ये नोंद झालेल्या शंभर जणांना कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आज घडीला कोरोना लसीकरणासाठी शंभरावर केंद्र जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून तयार करण्यात आले आहेत. या केंद्रात पुढील काही दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 
 

कोरोना लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यातील शासकीय व खाजगी डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, रुग्णालयातील इतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका असे एकूण साडेदहा हजार जणांची कोव्हिन ॲपमध्ये नोंद झाली आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाचे आदेश मिळण्याची प्रतीक्षा आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात सध्या शंभरावर केंद्र तयार केले आहेत. एक केंद्रावर प्रतिदिन शंभर जणांना लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
- डॉ.विवेक खतगावकर, 
जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना 

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine covid 19 jalna vaccination serum institute