पंचवीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, उदगीर तालुक्यातील विदारक चित्र !

युवराज धोतरे
Wednesday, 23 September 2020

उडीद व सोयाबीन ही नगदी पिके हाताला आली असताना आठ दहा दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. मोघा, नागलगाव, नळगीर व उदगीर या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून यामुळे या नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

उदगीर (लातूर) : उदगीर तालुक्यातील आठ महसूल मंडळात गेल्या आठ दिवसापासून झालेल्या पावसामुळे सोयाबीन, उडीद या नगदी पिकांचे जवळपास पंचेवीस हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उदगीर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. तालुक्यातील कोरडेठाक असलेले मध्यम प्रकल्प, पाझर तलाव, साठवण तलाव या पावसामुळे तुडुंब भरले आहेत. तिरु मध्यम प्रकल्पाचा अपवाद वगळता जवळपास सर्व तलावात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उडीद व सोयाबीन ही नगदी पिके हाताला आली असताना आठ दहा दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. मोघा, नागलगाव, नळगीर व उदगीर या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून यामुळे या नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय देवर्जन, हेर, तोंडार, वाढवणा येथे जरी एका दिवशी अतिवृष्टी एवढा पाऊस झाला नसला तरी सततच्या पावसाने उभ्या पिकात पाणी साचले आहे. नदी, नाले, ओढे काठचा परिसर पाण्यात गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे उडीद सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गेल्या तीन चार दिवसापासून उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, संबंधित परिसराचे मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी यांनी सर्वेक्षण सुरू केले आहे. सुरुवातीला दहा हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र सोमवारी झालेल्या पावसाने पुन्हा अतोनात नुकसान झाले असून जवळपास तालुक्यातील आठ महसूल मंडळातील पंचवीस हजार हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तवला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जेथे अतिवृष्टी झालेली आहे व ज्या गावात तलाव, नदी-नाले, ओढ यामुळे पाणी जाऊन नुकसान झाले आहे अश्या क्षेत्राचे आणि जेथे पाणी साचुन नुकसान झाले अश्या सर्व क्षेत्राचा संयुक्त पंचनामा करण्यात येत आहे. यासर्व नुकसानीचे पंचनामे करून याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्री मुंडे यांनी दिली आहे.

सरसकट अनुदान मिळावे! 
सध्या तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. जवळपास तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सरसकट पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत शासनाने द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop damage twenty-five thousand hectares Udgir news