जालन्यात कोरोना बळींची शंभरी

उमेश वाघमारे 
Tuesday, 11 August 2020

जिल्ह्यात आता कोरोना बळींची शंभरी पार झाली आहे. सोमवारी (ता.दहा) चारजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात जालना शहरातील तीन पुरुष रुग्णांचा, तर सिंदखेडराजा (ता. बुलडाणा) येथील एका महिलेचा समावेश आहे.

जालना -  जिल्ह्यात आता कोरोना बळींची शंभरी पार झाली आहे. सोमवारी (ता.दहा) चारजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात जालना शहरातील तीन पुरुष रुग्णांचा, तर सिंदखेडराजा (ता. बुलडाणा) येथील एका महिलेचा समावेश आहे. ४३ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यात दोन हजार ९१५ कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.

दरम्यान, सोमवारी ६४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एक हजार ८१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या एक हजार पाच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या कोरोनामुळे आतापर्यंत शंभर जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सोमवारी (ता.दहा) चार कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात शहरातील मिल्लतनगर येथील ३९ वर्षीय पुरुष, करवानगर येथील ६९ वर्षीय पुरुष व रामनगर पोलिस कॉलनी येथील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर  सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील ६८ वर्षीय महिलेचाही उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची पडणारी भर थांबण्यास तयार नाही. सोमवारी पुन्हा नव्याने ४३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.  

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, ६४ कोरोनाग्रस्त उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये अंबड शहरातील आठजण, जालना शहरातील सकलेचानगर व मेसखेडा (ता. मंठा) येथील प्रत्येकी सहाजण, संभाजीनगर येथील पाचजण, जमुनानगर येथील चारजण, भाग्यनगर, परतूर येथील बालाजी गल्ली, भोकरदन शहरातील नूतन कॉलनी येथील प्रत्येकी तीनजण,  जुनी एमआयडीसी, करवानगर, जांगडानगर, चंदनझिरा, अकोला देव व देऊळगावराजा येथील प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील प्रशांतीनगर, रामनगर, ख्रिस्ती कॉलनी, कादराबाद, पाॅवरलूम, राणानगर, गणेशपूर, वैभव कॉलनी, जालना शहर, अंबड तालुक्यातील रोहिलागड, गोंदी, पीरपिंपळगाव (ता. जालना), कोठी, सिंदखेडराजा येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एक हजार ८१० जणांनी उपचाराअंती कोरोनावर मात केली आहे. 

५५९ जण संस्‍थात्‍मक अलगीकरणात

जालना जिल्ह्यातील ५५९ जणांना सोमवारी (ता.दहा) संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.  यामध्ये शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ४७, शासकीय मुलींचे तंत्रनिकेतन वसतिगृह येथे १५, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ११, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स बी-ब्लॉक येथे २०, राज्य राखीव पोलिस बल क्वॉर्टर्स सी-ब्लॉक येथे ८१, पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ४४, परतूर येथील मॉडेल स्कूल येथे १७, केजीबीव्ही येथे १२, मंठा येथील केजीबीव्ही येथे नऊ, मॉडेल स्कूल येथे दहा, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ४२, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ४१, अंकुशनगर साखर कारखाना येथे ६३, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे १३, घनसावंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १३, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे ४६, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे ४२, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे चार यांना संस्‍थात्‍मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of hundred corona patients in Jalna