लातुरच्या उपमहापौरांसह दोघांवर अपात्रतेची टांगती तलवार

हरी तुगावकर
सोमवार, 2 डिसेंबर 2019

  • भाजप सभागृह नेता ऍड. गोजमगुंडे यांच्याकडून अपील 
  •  चंद्रकांत बिराजदार यांची काँग्रेसला साथ
  • भाजपकडून निलंबनाची कारवाई
  • गीता गौड यांच्यावरही कारवाई
     

लातूर: महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची दोन मते फुटली होती. त्यामुळे बहुमत असताना सुद्धा या पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे. त्यात कॉंग्रेसची मते घेऊन भाजपचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार हे उपमहापौर बनले.

या सर्व घटनाक्रमानंतर भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेता ऍड. शैलेश गोजमगुंडे यांनी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्यासह दोघांना अपात्र ठरवावे, असे अपील विभागीय आयुक्तांकडे दाखल केले आहे. आता कायदेशीर लढाई सुरू झाल्याने उपमहापौरांसह दोघांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. 

बहुमत असूनही भाजपचा पराभव
लातूर महापालिकेची आठ दिवसांपूर्वी महापौर पदाची निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाचे महापालिकेत बहुमत आहे. असे असताना सुद्धा कॉंग्रेसने फोडाफोडीचे राजकारण केले. भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवक कॉंग्रेसने फोडले. त्यांच्या मतामुळे कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे महापौर होऊ शकले. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसची खेळी यशस्वी झाली.  कॉंग्रेसने स्वतःचा उमदेवार न देता भाजपचे चंद्रकांत बिराजदार यांनाच उमेदवारी दिली. कॉंग्रेसची मते घेत बिराजदार उपमहापौर पदाच्या खुर्चीत बसले. महापालिकेत बहुमत असताना सुद्धा महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत झालेला पराभव भारतीय जनता पक्षाच्या जिव्हारी लागला आहे.

सावधान, मुले ब्रेक फास्ट करत नाहीत, हा होतो परिणाम

जेव्हा काँग्रेसच्या सभेत कार्यकर्ता म्हणतो प्रियंका चोप्रा जिंदाबाद

कायदेशीर लढाई

हातातून सत्ता गेली आहे. त्यामुळे पक्षाने तातडीने बिराजदार आणि गीता गौड या दोघांना पक्षातून निलंबित केले. आता पक्षाने कायदेशीर लढाई सुरू केली आहे. यात महापौर पदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेले पक्षाचे सभागृह नेता ऍड. शैलेश गोजमगुंडे यांच्या माध्यमातून ही लढाई सुरू केली आहे. यातून या दोघांना अपात्र ठरवावे असे अपील विभागीय आयुक्तांकडे करण्यात आले आहे. अशा घटनांत तडकाफडकी निकाल लागत नाही हे खरे असले तरी या कायदेशीर लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या सभागृह नेत्यांनी विभागीय आयुक्तांकडे काय दाखल केले आहे, याची मला माहिती नाही. नोटीस मिळाल्यानंतर कायदेशीर उत्तर देईन. 
चंद्रकांत बिराजदार, उपमहापौर. 

पक्षाने व्हीप काढला होता. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत उपमहापौर चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड यांना अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आले आहे. 
ऍड. शैलेश गोजमगुंडे, सभागृह नेता, भाजप. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deputy mayor and one more member may disqualify