VIDEO : दिलासादायक, सात वर्षांनंतर उदगीरचा 'देवर्जन' प्रकल्प फुल्ल ! 

युवराज धोतरे
Tuesday, 22 September 2020

पाळुतील झाडामुळे प्रकल्पास धोका

उदगीर (लातूर) : देवर्जन (ता.उदगीर) येथील मध्यम प्रकल्प तब्बल सात वर्षानंतर यंदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. सोमवारी (ता.२१) सायंकाळी झालेल्या पावसाने तलावाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू झाला आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उदगीर शहरासह देवर्जन, दावणगाव, शेकापुर, भाकसखेडा, गंगापूर आदी भावांना या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शिवाय परिसरातील जवळपास दोन हजार हेक्‍टर क्षेत्र या प्रकल्पावर अवलंबून आहे. गेल्या सात वर्षापासून या प्रकल्पात पाण्याचा साठा अत्यल्प होता.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यावर्षी अद्यापपर्यंत या प्रकल्पांमध्ये फक्त २५ टक्के पाणीसाठा झाला होता. या प्रकल्‍पावरील हेर, रोहिना लोहारा या भागात या वर्षी पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. गेल्या आठ दिवसापासून परिसरात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून सोमवारी सायंकाळी पावसाने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून मांडव्याद्वारे वाहू लागला आहे. या तलावातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने लाभक्षेत्रातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंगळवारी {ता.२२) देवर्जनचे तलाठी राहुल आचमे, कृषी सहाय्यक श्री हाळीघोंगडे यांनी या प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. निर्माण झालेल्या परिस्थितीची तहसील कार्यालयास माहिती दिली. देवर्जन परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. विसर्ग सुरू असलेल्या लाभक्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पाळुतील झाडामुळे प्रकल्पास धोका
या मध्यम प्रकल्पाच्या पाळुवर गेल्या अनेक वर्षापासून मोठमोठी झाडे उगवली आहेत. याची मुळे पाळू मध्ये गेले असल्याने या झाडांमुळे प्रकल्पाला धोका निर्माण झाला आहे. सातत्याने या विभागाकडे पाठपुरावा करूनही हि झाडे काढण्यात येत नसल्याने या धोक्‍यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या पूर्णक्षमतेने तलाव भरला असल्याने पाण्याचा दाब पाळुवर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या दाबामुळे तलाव फुटण्याचा धोका  निर्माण झाल्याने परिसरातील गावातील नागरिक भयभीत झाल्याची स्थिती आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devarajan dam overflow After seven years