Jaggery : धाराशिवच्या गूळ पावडरचा गोडवा देशभरात! जिल्ह्यातील अनेक जणांना रोजगार

धाराशिव जिल्ह्यातील गूळ पावडरचा गोडवा देशाच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे.
Jaggery
Jaggerysakal

धाराशिव - जिल्ह्यातील गूळ पावडरचा गोडवा देशाच्या कानाकोपऱ्यात घुमत आहे. जिल्ह्यात गूळ पावडर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची संख्या नऊवर पोचली असून दोन कारखाने ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्याच्या तुलनेत या जिल्ह्यात कारखान्यांचीही संख्या सर्वाधिक आहे.

एकेकाळी ऊस घेता का ऊस म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्या दारात कारखानदार आता उसाची मागणी करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. स्थानिक स्तरावरही रोजगार निर्मिती झाली आहे.

साखर कारखाना उभारण्यासाठी शासनाचे निर्बंध आहेत. २५ किलोमीटर परिसरात दुसरा कारखाना उभा करता येत नाही. कारखाना परिसरात उसाचे उत्पादन अधिक होते. परंतु गेल्या काही वर्षांत काही विविध कारणांमुळे सहकारी साखर कारखान्यांवर गंडांतर आले. कारखान्यांची संख्या घटली. दुसरीकडे उसाचे क्षेत्र वाढले.

अशावेळी अस्तित्वात असलेल्या कारखान्यांकडून उसाची तोड वेळेत होत नाही. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. गेल्या आठ वर्षांपूर्वी जिल्ह्यात अशी स्थिती होती. ही कसर गूळ पावडर निर्मिती व्यवसायाने भरून काढल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात सध्या गूळ पावडर निर्मिती करणारे नऊ कारखाने आहेत. दोन कारखाने गुळासाठी ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे धाराशिव, तुळजापूर आणि कळंब तालुक्यांतच हे कारखाने आहेत. राज्याच्या तुलनेत सर्वाधिक गूळ पावडर तयार करणारे कारखाने जिल्ह्यात असून दररोज सुमारे सात ते आठ हजार टन उसाचे गाळप होते.

दहा हजार जणांना दरवर्षी रोजगार

गूळ पावडर निर्मितीचा कारखाना हा साखर उद्योगासारखाच असतो. त्यामुळे साखर कारखान्याप्रमाणेच कर्मचारी काम करतात. एका कारखान्यात किमान शंभर जणांना प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होते. अप्रत्यक्षरीत्या सुमारे ५०० ते १००० लोक यावर अवलंबून असतात, अथवा तेवढ्या नागरिकांना यातून रोजगार तयार होतो. जिल्ह्यात सध्या याच गूळ पावडर निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून आठ ते १० हजार लोकांना रोजगार मिळत आहे. दरवर्षी हंगामी का असेना; पण संबंधितांच्या हातांना काम मिळत आहे.

सध्या राज्याच्या विविध ठिकाणी गूळ पावडरला मागणी आहे. मागणीप्रमाणे निर्मिती व विक्रीवर भर आहे. आमच्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. अनेकांना रोजगारही मिळाला आहे. याचा आनंद आहे.

- दत्ता कुलकर्णी, अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक अॅग्रीटेक इंडस्ट्रिज, लि.

विविध राज्यांत मागणी

तीर्थक्षेत्री प्रसाद बनविण्यासाठीही गूळ पावडर वापरली जात आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात जिल्ह्यातील गूळ पावडरची मागणी असून गोडवा दूरपर्यंत गेला आहे. याशिवाय चॉकलेट, थंडपेयाच्या कंपन्यांमध्येही गूळ पावडरचा वापर केला जातो. सध्या जिल्ह्यातील गूळ पावडरला केरळ, गोवा, तमिळनाडूसह राज्यस्थान, पश्चिम बंगाल राज्यातही मागणी होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील हा व्यवसाय आणखी जोर धरण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com