esakal | दिव्यांगांसाठी विशेष शाळांमध्ये आता उपचार केंद्र
sakal

बोलून बातमी शोधा

divyang.jpg

लातूर जिल्ह्यातील ५५ शाळांत सुविधा; दिव्यांगांचा शोध आणि नोंदणीही 

दिव्यांगांसाठी विशेष शाळांमध्ये आता उपचार केंद्र

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम व दिव्यांगांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार दिव्यांगत्त्व येण्यास प्रतिबंध करणे, दिव्यांगत्त्वाचे तातडीने निदान करणे व त्यांच्या विकासासाठी होणार उशीर दूर करण्याची तरतूद केली आहे. यानुसार सरकारने विशेष शाळा संहिता लागू केली असून, जिल्ह्यातील ५५ विशेष शाळांमध्ये दिव्यांगांसाठी शीघ्र निदान व उपचार केंद्रांची स्थापना होणार आहे. केंद्रांसाठी आवश्यक सुविधांची तातडीने उभारणी करून दिव्यांग पालकांना सुविधा देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी शाळांना दिले आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या केंद्रामध्ये किमान दहा बालकांचा प्रवेश जिल्हा परिषदेने बंधनकारक केला आहे. या उपक्रमात शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. शाळेतील विशेष शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून दिव्यांगसदृश्य बालकांचा शोध घेऊन त्यांच्या पालक व कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. बालकांवरील उपचारासाठी वैद्यकीय, नर्सिंग, आहार, थेरपी आदी सुविधा केंद्रात उपलब्ध करण्यात येणार आहेत. हे केंद्र आठवड्यातून पाच दिवस व रोज सहा दिवस सुरू ठेवावे लागणार आहेत. केंद्रांत दिव्यांग बालकांच्या वैयक्तिक माहितीचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. केंद्रांत सीसीटीव्ही, संगणक, प्रिंटरसह इंटरनेटच्या सुविधाही संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्रात प्रवेश घेतलेल्या बालकांच्या पालकांकडून कोणतेही शुल्क शाळांना घेता येणार नाही. केंद्रांची सुविधा ही पूर्ण मोफत असून, त्यासाठी संस्थांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. केंद्रे यांनी केले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पालकांनी साधावा संपर्क 
पालकांनीही त्यांच्या पाल्यांना दिव्यांग सदृश लक्षणे किंवा हालचाल आढळून येताच शीघ्र निदान व उपचार केंद्रांशी संपर्क साधून उपचार व अन्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गोयल यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व शीघ्र निदान व उपचार केंद्रांची यादी संबंधित पंचायत समित्या व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)