शाळा बंद, मग शुल्काचा तगादा का? 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना - इंग्रजी शाळांकडून ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. लॉकडाउनच्या काळात शाळा बंद आहेत. असे असताना इंग्रजी शाळांचे चालक पालकांवर शुल्क भरण्यासाठी दबाव आणत आहेत. लॉकडाउनच्या काळातील शिक्षणाचे इंग्रजी शाळांनी शुल्क घेऊ नये. शिक्षण ऑनलाइन असताना फी कशाची घेता? असा प्रश्न शुक्रवारी (ता. १४) जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत वादळी चर्चेदरम्यान सदस्यांनी उपस्थित केला आहे. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी (ता. १४) स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, सभापती अयोध्या चव्हाण, पूजा सपाटे, प्रभा गायकवाड, परसुवाले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील इंग्रजी शाळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० टक्के फी माफ करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन दिल्या होत्या; मात्र त्यावर अजूनही अनेक इंग्रजी शाळांनी अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या मुद्यावरून वादळी चर्चा झाली. लॉकडाउनच्या काळात शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सध्या सुरू आहे. यासाठी पालकांना मोबाईल, नेट डाटासाठी पैसे खर्च करावे लागत आहे. अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने अडचणी येत आहेत. त्यात पुन्हा इंग्रजी शाळांकडून पालकांना शाळेची फी भरण्यासाठी दबाव आणला जात आहे, अशी तक्रार सदस्यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुल्कात कपात केली नाहीतर त्या शाळांवर कारवाई करा, अशी मागणी सदस्यांनी केली.

दरम्यान, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तलावाचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

आरोग्य सुविधांचा बोजवारा 

जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, रुग्णालयातील सेवांचा बोजवारा उडाल्याचेही बैठकीच्या निमित्ताने दिसून आले. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. आरोग्य विभागाचे अधिकारी ग्रामीण भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली; तसेच कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवांचा दर्जा वाढविणे गरजेचे आहे. अनेक ग्रामीण रुग्णालयांत सलाईन नाही, काही ठिकाणी सिरीन नाही, अशी अवस्था आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लागणारी रेबिज लस अनेक ग्रमीण रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही; तसेच जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यांचा आरोग्य विभागाने शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com