लातूरात दोन संघटनांच्या वादात शेतकऱ्यांचे मरण!  

हरी तुगावकर
Sunday, 22 November 2020

पाच दिवसांपासून मार्केट यार्ड बंद; कोट्यवधीची उलाढालही ठप्प. 

 

लातूर : येथील अडत बाजारातील खरेदीदार व हमाल या दोघांच्या संघटनेतील मजुरी वाढीचा वादाचा परिणाम अडत बाजार बंद होण्यावर झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून मार्केट यार्ड बंद आहे. यातून कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. सध्या सीझन सुरू आहे. शेतमालाची मोठी आवक आहे. बाजारच बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे मात्र मरण होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
येथील लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात सुमारे बाराशे हमाल आहेत. दर तीन वर्षांनी या हमालांची खरेदीदारांकडून मजुरी वाढवली जाते. मार्च २०२० मध्ये तीन वर्ष संपले आहेत. त्यात कोरोनामुळे एक दीड महिने बाजार बंद राहिला. त्यानंतर मात्र अडत बाजार सुरळीत सुरु झाला. बाजार सुरू झाल्यानंतर हमालांच्या संघटनांनी खरेदीदारांच्या संघटनेकडे मजुरी वाढीची मागणी केली. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हमाली वाढीसाठी संघटनेने बंद पुकारला. पाच दिवसांपासून हा बंद सुरू आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे खरिपाचे पीकही चांगले आहे. यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात आले आहे. सध्या सणाचे तसेच लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे शेतकरी सोयाबीन मोठ्या प्रमाणात बाजारात आणत आहेत. सत्तर ते ऐंशी हजार क्विंटलची आवक सध्या बाजारात आहे. बाजार बंद राहिल्याने या शेतमालाची कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार बंद राहिल्याने अनेक शेतकरी आता खासगी कंपन्यांना माल विकताना दिसत आहेत. सीझन सुरू असल्याने बाजार सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

मजुरी वाढीवरून सध्या बाजार बंद आहे. दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच कामगार आयुक्त, माथाडी बोर्डाशीची चर्चा करण्यात आली आहे. बाजार बंद ठेवून तोडगा निघणार नाही. बाजार पहिल्यांदा सुरू करावा अशी विनंती करण्यात आली आहे. बाजार सुरु करून संयुक्त बैठका घेऊ, बाजार समिती मध्यस्थाची भूमिका घेईल. दोन्ही संघटनांनी मान्य केले आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. २३) अडत बाजार सुरू होईल. तसे संदेशही आम्ही दिले आहेत. 
- ललितभाई शहा, सभापती, लातूर बाजार समिती. 

हमाली दर वाढीच्या कारणामुळे बाजार बंद आहे. खरेदीदारांकडून या मागणीस प्रतिसाद न मिळाल्यामुळे हमालांनी बाजार बंदचे हत्यार उपसले आहे. खरेदीदार व्यापारी व हामालांच्या वादात शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे बाजार बंद ठेऊन हमाली दरवाढीचा प्रश्न मार्गी न लावता चालु ठेऊन मार्गी लावावा. विनाकारण शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करू नये. 
- राजकुमार सस्तापुरे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute between two organizations Latur market farmers distressed