ज्या पुरुषांना घरात बायका मारतात, त्यांनी कुठे कॉल करायचा मुख्यमंत्री साहेब... 

Domestic Violence News
Domestic Violence News

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात कायम घरात राहू लागल्यामुळे नवरा-बायकोत भांडणे वाढू लागली आहेत. यामुळे घरातील पुरुषांकडून महिलांना मारहाण होत असल्याचेही महिला आयोगाने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केला. पण ज्या पुरुषांना घरात बायका मारतात, त्यांनी कोणत्या क्रमांकावर कॉल करायचा मुख्यमंत्री साहेब, असा सवालही काही पत्नीपीडित पुरुषांनी केला आहे.

औरंगाबाद येथील मूळ रहिवासी, पण पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या एका ४२ वर्षीय पुरुषाने ही दाद मागितली आहे. घरात पती-पत्नी आणि दोन मुले. लग्नाला दोन दशके होऊन गेली, तरीही नवरा-बायकोत वादविवाद होतात. याचे पर्यवसान हाणामारीत होते. या अभियंत्याला त्याची पत्नी मारहाण करत असल्यामुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे त्याने म्हटले आहे. अर्थातच, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर. 'सकाळ'शी संपर्क करून त्यांनी पुरुषांसाठी काही तक्रारीचा मार्ग आहे का, याची विचारणा केली होती.

आधीच आलेले कोरोनाचे संकट, त्यामुळे करावे लागलेले लॉकडाऊन आणि त्यातून वाढलेल्या घरगुती हिंसाचाराच्या घटना अशी तिहेरी डोकेदुखी सध्या प्रशासनाबरोबरच पोलिसांनाही सहन करावी लागत आहे. या काळात किमान घरातल्या हिंसाचाराच्या घटना तरी घडू नयेत, असं काही घडल्यास त्या स्त्रियांना तक्रार तरी करता यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १९ एप्रिलला फेसबुक लाईव्हद्वारे केलेल्या भाषणात एक हेल्पलाईन नंबर दिला. महिलांना पती वा इतर कुणाविरुद्ध तक्रार करायची असल्यास पोलिसांच्या १०० नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

समुपदेशनासाठीही दिलाय संपर्क

सतत घरात राहिल्यामुळे भांड्याला भांडे लागणारच. त्यातून कुणाला मानसिक अस्वस्थता वाटत असेल, तर त्यांनीही १८०० १२० ८२००५० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्यांसाठी समुपदेशनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच, आदिवासी विकास विभागानंही १८०० १०२ ४०४० क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलंय.

महिला आयोग म्हणतो... 

राष्ट्रीय महिला आयोगानं लॉकडाऊनच्या सुरवातीच्या २५ दिवसांमध्ये देशातल्या वेगवेगळ्या शहरांमधून आलेल्या तक्रारींचा आधार घेत, घरगुती हिंसाचारांच्या घटनांत तब्बल ९५ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा केला आहे. २७ फेब्रुवारी ते २२ मार्च आणि २३ मार्च ते १६ एप्रिल या काळात आलेल्या तक्रारींची तुलना केल्यानंतर आयोगानं महिलांवरील हिंसाचारात दुपटीनं वाढ झाल्याचं म्हटलं आहे. 

लॉकडाऊनपूर्वी घरगुती हिंसाचाराच्या १२३ तक्रारी आल्या होत्या. तर लॉकडाऊनकाळात ऑनलाईन आणि इतर माध्यमांतून घरगुती हिंसाचाराच्या २३९ तक्रारी प्राप्त झाल्याचं आयोगानं म्हटलं होतं. सायबर गुन्हेगारी प्रकरणांच्या लॉकडाऊनपूर्वी ३९६ तक्रारी होत्या, तर लॉकडाऊन केल्यानंतर त्यांची संख्या तब्बल ५८७ इतकी झाल्याचं महिला आयोगानं म्हटलं होतं. 

महिलांना मिळाले संरक्षण, पण पुरुषांचे काय?

महिला आयोगाच्या तक्रारीची दखल केंद्राबरोबरच राज्य सरकारांनीही घेतली. पण या काळात पुरुषांनाही एका विचित्र घुसमटीतून जावं लागत असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. काही जणांना घरात बायकांकडूनही मारहाण होत असल्याचा दावा केला आहे. मात्र, अशा पुरुषांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. याबाबत औरंगाबादच्या पत्नीपीडित पुरुष संघटनेशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com