लातूर : केंद्रेवाडी (ता.अहमदपूर) व सुकणी येथील कोंबड्याचा बर्ड फ्ल्यूमुळेच मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता प्रशासनाने हा संसर्ग पुढे इतर पक्षांना होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यास सुरवात केली आहे. या करिता केंद्रेवाडी परिसरात असलेल्या सुमारे नऊ हजार कोंबड्या मारल्या जाणार आहेत. ते कामही आता पशूसंवर्धन विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. या संसर्गामुळे जिल्ह्यातील कुक्कटपालकांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे खवय्यांना देखील आता काळजी घ्यावी लागणार आहे.
देशभरात काही राज्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. मराठवाड्यातील काही जिल्हे देखील या संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. लातूर जिल्हा देखील त्याला अपवाद राहिला नाही. गेल्या आठवड्यात केंद्रेवाडी (ता.अहमदपूर) येथे २५० कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुकणी (ता.उदगीर) येथे देखील काही कोंबड्या दगावल्या होत्या. पशूसंवर्धन विभागाच्या वतीने या मृत कोंबड्याचे नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्रशासनाला आला आहे. बर्ड फ्ल्यूमुळेच या कोंबड्या मृत झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे प्रशासनाने आता प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केल्या आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या संदर्भात एक आदेशही काढले आहेत. केंद्रेवाडी व सुकणी या बाधित क्षेत्रास केंद्रबिंदू धरून एक किलोमीटर त्रिज्येचे संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील पोल्ट्री फार्ममधील कुक्कट पक्षी, उर्वरित पक्षीखाद्य, अंडी नष्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जलद प्रतिसाद दलाच्या मार्फत शास्त्रोक्त पद्धतीने संसर्गाचा प्रसार होवू नये म्हणून प्रभावित पक्षांना मारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. केंद्रेवाडी परिसरात चार ते पाच पोल्ट्री फार्म आहेत. त्यामुळे तेथील आठ ते नऊ हजार कोंबड्या मारल्या जाणार आहेत. कोरोना पाठोपाठ आलेल्या या बर्ड फ्ल्यूच्या संकटामुळे कुक्कटपालकांचे कंबरडे मोडणार आहे.
केंद्रेवाडी आणि सुकणी येथे बर्ड फ्ल्यूमुळेच कोंबड्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्रेवाडी परिसरातील आठ ते नऊ हजार कोंबड्या मारण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. औशात एका बगळ्याचा मृत्यू झाला असून त्याचाही अहवाल प्रयोगशाळेला पाठवण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व पोल्ट्री फार्मधारकांना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- नानासाहेब कदम, उपायुक्त, पशूसंवर्धन विभाग, लातूर
संपादन - गणेश पिटेकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.