सर्व्हर डाऊनमुळे उमेदवार ताटकळले, ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत अडथळे

अनिरुद्ध धर्माधिकारी
Saturday, 26 December 2020

निवडणुकांसाठी आनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारी (ता. २३) सुरवात झाली. मात्र, शनिवारी (ता. २६) सर्वर डाऊन असल्याने उमेदवारी अर्ज भरता आले नाही.

आष्टी (जि.बीड) : निवडणुकांसाठी आनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारी (ता. २३) सुरवात झाली. मात्र, शनिवारी (ता. २६) सर्वर डाऊन असल्याने उमेदवारी अर्ज भरता आले नाही. त्यामुळे उमेदवारांना दिवसभर संगणक केंद्रांमध्ये ताटकळावे लागले. आष्टी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडणार आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज आनलाईन पद्धतीने भरण्यास बुधवारी सुरवात झाली असली तरी कागदपत्रांची जमवाजमव करण्यात उमेदवारांचे तीन दिवस निघून गेले.

 

 

या कालावधीत नाममात्र सहा उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयास प्राप्त झाले. शनिवारी (ता. २६) शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक आस्थापना बंद असल्या तरी संगणक केंद्र सुरू होती. कागदपत्रांची जमवाजमव झाल्याने उमेदवारांनी या केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली. सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत आनलाईन अर्जांसाठीच्या वेबसाईटचे सर्वर धिम्या गतीने काम करत होते. त्यामुळे थोड्याफार उमेदवारांचे अर्ज भरून पूर्ण झाले. मात्र दुपारी दोननंतर मात्र सर्वर डाऊन झाल्याने, कामकाज होऊ शकले नाही.

 

 

अर्ज भरण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी आलेल्या उमेदवारांचा संपूर्ण दिवसच सर्वर डाऊन झाल्याने वाया गेल्याने उमेदवारांमधून संताप व्यक्त होत होता. काही उमेदवारांनी तहसीलदार शारदा दळवी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी (ता. ३०) पर्यंतच मुदत असल्याने येत्या चार दिवसांत मुदतीच्या वेळेपर्यंत सर्व्हर साथ देऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडेल की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

 

 

राज्यभरात मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. सर्व्हरवर दिवसा अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी असल्याने सर्व्हरवर लोड येऊ शकतो. अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने आगामी काळात अर्ज भरण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करत आहोत.
शारदा दळवी, तहसीलदार, आष्टी

अर्ज भरण्यासाठी आमच्या पॅनलच्या उमेदवारांसह आनलाईन अर्ज भरण्यासाठी सकाळी नऊ वाजताच संगणक केंद्रावर दाखल झालो होतो. एकूण १८ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे होते. दुपारी दोन वाजनंतर सर्व्हर पूर्णपणे ठप्प झाल्याने रात्री उशिरापर्यंत अर्ज भरण्यासाठी ताटकळावे लागले.
बाबासाहेब गर्जे, इच्छुक उमेदवार, हातोला

 

 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due To Server Down Aspirants Awaiting Online Form Fill Up Ashti Beed News