उस्मानाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत फूट पडणार नाही, विरोधकांना एकनाथ शिंदेंनी फटकारले

तानाजी जाधवर
Sunday, 17 January 2021

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की धनंजय मुंडे प्रकरणी विचारले असता त्यांनी आपण विकासकामाचे महत्त्वाच्या विषय मार्गी लावण्यासाठी आलो असल्याचे सांगत यावर विषयावर बोलण्याचे टाळले.

उस्मानाबाद : उस्मानाबादच्या नामांतर विषयावरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल असे विरोधकांना वाटत असले तरी असे काहीच होणार नाही, या शब्दात नगरविकाश मंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारले आहे. उस्मानाबादेत शनिवारी (ता.१६) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

शिंदे म्हणाले, की धनंजय मुंडे प्रकरणी विचारले असता त्यांनी आपण विकासकामाचे महत्त्वाच्या विषय मार्गी लावण्यासाठी आलो असल्याचे सांगत यावर विषयावर बोलण्याचे टाळले. अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेल्या दलित वस्तीतील कामांमधील गैरव्यवहारप्रकरणी विचारले असता जिल्हाधिकारी पंधरा दिवसांत न्यायालयात अहवाल सादर करणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले. उस्मानाबाद शहरात भुयारी गटार योजनेला लवकरच मान्यता देणार आहे, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवाय जिल्ह्यातील नगरपालिकेला निधीची कमतरता पडू देणार नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्याचे नगरविकास सचिव महेश पाठक, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आमदार कैलास पाटील, ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत आदींची यावेळी उपस्थिती होती.

मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील आठ नगरपालिका व दोन नगरपंचायत यांच्या उत्पन्नाच्या मर्यादा पाहता विकासकामे करण्यासाठी मर्यादा येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगरविकास विभागाच्या माध्यमातून या सर्व नगरपालिकांना व नगरपंचायतींना भरघोस निधी देऊन विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उस्मानाबादच्या नगरपालिका पाणीपुरवठा योजनेसह इतर नगरपालिकेच्या पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. तसेच उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली भुयारी गटार योजना मंजूर करून ती लवकरात-लवकर कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Shinde Said No Break Up In Mahavikas Over Osmanabad Renaming Osmanabad News