शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार असंवेदनशील - फडणवीस; बदनापूरात शेतकऱ्यांशी संवाद

Fadnvis corona.jpg
Fadnvis corona.jpg

बदनापूर (जालना) : 'साहेब शेतकऱ्यांवर निसर्ग कोपला, सरकारही लक्ष देत नाही, अतिवृष्टीत पिकांसह मातीही वाहून गेली. जनावरे दगावली, शेततळे आणि विहीरीही ढासळल्या. मात्र, अद्याप आम्हाला कवडीचीही मदत मिळाली नाही. आमच्या व्यथा सरकारला सांगा साहेब मदत मिळवून द्या, अशी भावनिक साद अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना घातली. 

जालना जिल्ह्यातील मात्रेवाडी शिवारात फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा बुधवारी (ता.21) पाहणी दौरा केला. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
 यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री तथा आमदार पंकजाताई मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, आमदार संभाजी निलंगेकर, भागवत कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मात्रेवाडी शिवारात सुभाष जैस्वाल या अतिवृष्टीने बाधित कपाशीच्या क्षेत्राला श्री. फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी परिसरातील शेतकरी रघुनाथ होळकर, ज्ञानेश्वर शेळके, प्रल्हाद पवार, नामदेव गिते, भाऊसाहेब सिरसाठ, मच्छिंद्र पवार यांनी त्यांना अतिवृष्टीत झालेल्या कपाशी, सोयाबीन, बाजरी, मका मोसंबी, डाळींब आदी पिकांच्या नुकसानीचे वास्तव सांगितले. यावेळी शेतकरी म्हणाले की, साहेब आमच्या तालूक्यात अक्षरशः आभाळ फाटले. एकदा नव्हे तर अनेकदा अतिवृष्टीने कहर माजवीला. पेरलेली बियाणे त्यात टाकलेली खते वाहून गेली. जमिनी खरडून गेल्यात. बांध-बंधारे फुटली. रस्तेही वाहून गेले. आमची दुभती जनावरे पुरात वाहून दगावली. साहेब निसर्गाने मोठा अनर्थ केला. मात्र सरकार केवळ दौऱ्यावर दौरे करीत आहेत. पीक पंचनाम्याचे फार्स सुरू आहेत, मात्र अद्याप आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कवडीची मदत मिळालेली नाही. 

साहेब आपण विरोधीपक्ष नेते आहात. त्यामुळे आपण पोटतिडकीने आमच्या समस्या सरकारपर्यंत पोचवाव्यात, आम्हाला पिकांच्या नुकसानीसह खरवडून गेलेल्या जमिनी आणि वाहून गेलेल्या पशुधनांची देखील मदत देण्यास सरकारला बाध्य करावे, अशी आर्जवी मागणी शेतकऱ्यांनी केली.

फडणवीसांनी साधला संवाद - 

यावेळी श्री. फडणवीस संवाद साधताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार असंवेदनशील आहे. शेतकरी संकटात असताना त्यांना अद्याप नाकर्ते सरकारने कुठलीच मदत दिली नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आपण आमच्या सोबत राहा. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी सरकारला बाध्य केल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास व्यक्त केला. 

यांची होती उपस्थिती 
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. सानप, तहसिलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांच्यासह भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य बद्रीनाथ पठाडे, जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते, हरिश्चंद्र शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सत्यनारायण गेलडा, वसंत जगताप, तालुकाध्यक्ष भीमराव भुजंग, भाजप युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष गणेश कोल्हे, सरचिटणीस नंदकिशोर शेळके, पद्माकर जऱ्हाड, विलास जऱ्हाड, गोरखनाथ खैरे, संतोष पवार, महेश लड्डा आदींसह शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com