... अखेर त्याच्यासोबतच झाले तिचे थाटात लग्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

मे महिन्यात होणारा एक बालविवाह उस्मानाबाद जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने रोखला होता. त्यावेळी कुटुंबीयांचे समुपदेशन करीत 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलीचा विवाह करण्याबाबत समजावून सांगितले होते. त्यानुसार कुटुंबीयांनी संबंधित मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याने आज तिचा विवाह थाटात लावून दिला.

उमरगा (जि. उस्मानाबाद) - तालुक्‍यातील एकुरगा गावात 24 मे रोजी होणारा नियोजित बालविवाह जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीने रोखला होता. 18 वर्षे पूर्ण झाल्याने संबंधित मुलीचा विवाह सोमवारी (ता. दोन) एकुरगा येथे थाटात पार पडला. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समिती, जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात झाला. 

कुटुंबीयांचे समुपदेशन 
जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना गेल्या 21 मे रोजी संबंधित मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे ही माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मुलीचे गाव गाठून पालकांची भेट घेतली. तसेच या सर्वांनी मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करीत मुलीचा विवाह 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर करा, असे समजावून सांगितले. त्यावेळी मुलीचे वय सतरा वर्षे सहा महिने होते. सर्वांनी समुपदेशन केल्याने कुटुंबीयांनी तिचा विवाह 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्याचा निर्णय घेतला होता. 

पालकांनो, हे वाचा - मुलं ब्रेकफास्ट करीत नाहीत, शिक्षणावर होतोय परिणाम

नियोजित वराबरोबर झाले शुभमंगल 
संबंधित मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्याने आज तिचा विवाह थाटात पार पडला. विशेष म्हणजे त्यावेळच्या नियोजित वराबरोबर तिचे शुभमंगल झाले. जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीचे सदस्य बिद्री, महिला समुपदेशक राऊ भोसले, दक्षता कमिटीच्या सदस्य सरोजा सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, रेखा पवार, मंजूषा चव्हाण, सोनल पट्टेवार, कल्पना कांबळे, नगरसेवक गोविंद घोडके आदींनी वधू-वराला शुभेच्छा दिल्या. जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य महिलांनी मुलीच्या आईला आर्थिक मदत दिली. सरपंच श्रीमती पाटील, पोलिस पाटील महेशंकर पाटील उपस्थित होते. 

संकटग्रस्त मुलांसाठी 'चाईल्ड लाईन' 
बालविवाह रोखण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत चाईल्ड लाईन ही एक सेवाभावी अशासकीय संस्था कार्यरत आहे. ही संस्था देशभरात 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी 24 तास अविरतपणे कार्य करते. अनाथ मुले, भिक्षेकरी, पिडीत, अन्यायग्रस्त, हरवलेली वा सापडलेली मुले, बालकामगार, बालविवाह यास बळी पडलेल्या मुलामुलींसाठी ही संस्था कार्यरत आहे. चाईल्ड लाईन अशा संकटग्रस्त मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन, समुपदेशन करून त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. मुलींनी प्रथमत: शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे निर्णयक्षमता येऊन बालविवाहाला आळा घातला जाऊ शकतो. 

काय सांगता - जेव्हा काँग्रेसच्या सभेत प्रियंका चोप्राच्या नावाने होतो जयजयकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family members marry the girl after she completes 18 years