कविता सत्तेची गुलाम नसते : डॉ. कुमार विश्वास

सुशांत सांगवे
Sunday, 15 December 2019

एका रात्रीत स्थापन झालेल्या फडणवीस सरकारपासून नागरिकांच्या खात्यावर जमा न झालेल्या १५ लाखापर्यंत, नोटाबंदीपासून कांद्याच्या वाढलेल्या भावापर्यंत अशा अनेक विषयावर मार्मिक भाष्य करत चारही कविंनी रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळवली.

लातूर : कविता सत्तेसोबत कधीही नसते. ती सत्तेची गुलाम नसते. जेंव्हा कविता सत्तेसोबत राहील तेंव्हा कविता संपलेली असेल, असे मत व्यक्त करत प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी राजकीय, सामाजिक परिस्थितीवर कवितांमधून परखड भाष्य व्यक्त केले.

लातूर अर्बन को-ऑप बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने काव्यसंध्या ही मैफल आयोजिण्यात आली होती. यात कुमार विश्वास यांच्याबरोबरच संपत सरल (जयपूर), कविता तिवारी (लखनऊ), शंभू शिखर (दिल्ली) हे कवी सहभागी झाले होते. काश्मिरमधील कलम ३७० प्रकरणापासून नागरिकत्व दुरूस्ती विधेयकापर्यंत, एका रात्रीत स्थापन झालेल्या फडणवीस सरकारपासून नागरिकांच्या खात्यावर जमा न झालेल्या १५ लाखापर्यंत, नोटाबंदीपासून कांद्याच्या वाढलेल्या भावापर्यंत अशा अनेक विषयावर मार्मिक भाष्य करत चारही कविंनी रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळवली. मात्र, स्त्री-भ्रूण हत्येपासून नुकत्याच घडलेल्या हैदराबादमधील अत्याचाराच्या प्रकरणावर केलेल्या कवितांतून त्यांनी प्रत्येकाला विचार करण्यास भागही पाडले.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

तप्रधान पहाटे पाच वाजता उठतात. पण ते इतक्या लवकर का उठतात? हे इतके दिवस समजले नव्हते; पण महाराष्ट्र्रात पहाटे शपथविधी झाल्यानंतर ते कळले, अशी मार्मिक टिपण्णी करून कुमार विश्वास यांनी 'यहां सब लोग कहते हैं, मेरी आखोमे आसू है, जो तु समजे तो मोती हैं, जो ना समजे तो पानी हैं' अशी कविता सादर केली. कविता तिवारी यांनी स्त्री भ्रूण हत्या, स्त्री अत्याचारावर कविता सादर केल्या. त्यावेळी 'मैं भारत की बेटी हूँ, मैं हरगीज डर नहीं सकती, मुझे मालूम हैं, मैं मरने से पहले मर नहीं सकती...' असा विश्वासही त्यांनी कवितेतून व्यक्त केला. संपत सरल यांनी विनोदी मार्मिक शैलीत राजकीय, सामाजिक, आर्थिक, विषयवार काव्य रचना केली तर शंभू शिखर यांनी राजकीय विडंबन काव्य सादर करून उपस्थितांना खळखळून हसवले.

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...

या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, विलास साखर कारखान्याच्या संचालक वैशाली देशमुख, आमदार संजय बनसोडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अर्चना पाटील-चाकूरकर, अरविंद पाटील-निलंगेकर, बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी, उपाध्यक्ष आदिनाथ सांगवे, स्वागताध्यक्ष रुद्राली पाटील चाकूरकर, राहुल राठी उपस्थित होते.

...हा दिलखुलासपणा शिकण्यासारखा

अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना वारंवार आपल्या निवासस्थानी काव्य मैफली भरवायचे. अनेक कवींना या मैफलीत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यात मीही एक आहे. हे मी माझे सौभाग्यच समजतो. त्यावेळी वाजपेयी यांनी देशभर फिरून यात्रा केली होती. त्यामुळे त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. या घटनेवर त्यांच्यासमोरच मी कवितेतून टिपण्णी केली. भारतीय जनता पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आजूबाजूला होते. त्यांचे चेहरे पडले; पण या कवितेचे खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनीच दिलखुलासपणे स्वागत केले. हा दिलखुलासपणा आजच्या राजकारण्यांनी शिकण्यासारखा आहे, अशी आठवण कुमार विश्वास यांनी या वेळी सांगितली. तेव्हा मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Famous Poets Participated in Kavyasandhya in Latur