मेहनत, प्रयोगशीलतेच्या जोरावर शेतकरी बनला उद्योजक, कोथलकरांचा प्रवास थक्क करणारा 

विशाल अस्वार 
Friday, 30 October 2020

घाम गाळून उत्पादन घेतल्यावर कवडीमोल दरात विकायचे आणि तोच प्रक्रिया केलेला माव रोजच्या जीवनात दुकानातून दुप्पट किमतीत घ्यायचा मात्र यावर जालना जिल्हातील शेतकर्याने मात केली आहे. शेतकरीत बनला उद्योजक असा प्रवास त्यांनी साकारला आहे. प्रयोगशीलता, जिद्द, अथक मेहनतीच्या जोरावर वालसावंगी येथील शेतकरी बाळासाहेब कोथलकर यांची वाटचाल सर्वांना प्रेरणा देईल. 

वालसावंगी (जालना) : घाम गाळून उत्पादन घेतल्यानंतर शेतमालाला कवडीमोल दरात व्यापाऱ्याला विकायचे आणि नंतर तोच प्रक्रिया केलेला शेतमाल रोजच्या जीवनात दुकानातून विकत घ्यायचा असे अनेकांच्या बाबतीत घडते. पण शेतकरी बाळासाहेब कोथलकर यांनी प्रयोगशीलतेची साक्ष देत हे चित्र पालटले आहे. त्यांनी बालाजी उद्योगाच्या माध्यमातून गावातच प्रक्रिया उद्योग सुरु केला, त्यास बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

वालसावंगी येथील बाळासाहेब कोथलकर यांनी सहा वर्षांपूर्वी बालाजी उद्योगाची सुरुवात स्वतःच्या शेतात केली. हरभरा,गहू, सोयाबीन ग्रेडिंग व क्लीनिंग सुरुवातीला करण्यात आले. नंतर उद्योगाची व्याप्ती वाढवीत विविध मशिनरी त्यांनी आणल्या. मग अन्य शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेत प्रक्रिया व विक्री सुरू केली. प्रारंभी उद्योगाबाबत अनुभव नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र प्रखर इच्छा शक्तीच्या जोरावर उद्योगाने गती घेतली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रक्रिया केलेल्या मालास मागणी 
या उद्योगात प्रक्रिया केलेल्या हरभरा व सोयाबीनला चांगली मागणी आहे. व्यवस्थित पॅकिंग केलेल्या या शेतमालास वाशी,मुंबई यासह अनेक ठिकाणी पाठविले जाते. उद्योग समूहाच्या वतीने मीठ, साबुदाणा, हळद उत्पादन बाजारात उपलब्ध केले आहे. याशिवाय जनावरांसाठी आवश्यक असलेल्या मुरघास, ढेप निर्मितीही सुरु केली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लवकरच मसाले निर्मिती 
हरभरा,सोयाबीन विक्रीसोबतच आता श्री.कोथलकर लवकरच मिरचीपूड पॅकिंगसह मसाले निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर मिरची लागवड होते, त्यामुळे या मिरचीचा वापर करून मसाले निर्मिती केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अनेकांना मिळाला रोजगार 
बालाजी उद्योगामुळे परिसरातील अनेक महिला, युवक, कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे, शिवाय ग्रामीण भागातील हा प्रक्रिया उद्योग अनेक धडपडणाऱ्या उद्यमशील युवकांना कृषी उद्योग उभारण्याची प्रेरणा देत आहे. 

ट्रॅक्टरद्वारे विजेची पर्यायी व्यवस्था 
ग्रामीण भागात वीज पुरवठा सतत विस्कळीत असतो. त्यामुळे श्री. कोथलकर यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने विजेची निर्मिती सुरु केली. परिणामी वीज पुरवठा खंडीत झाला तरी उद्योगाची कामे बंद पडत नाहीत. 

ग्रामीण भागातील लघू उद्योगाचे महाराष्ट्रात नाव व्हावे,या हेतूने हा बालाजी उद्योग सुरू केला. अगोदर मार्केटिंगची माहिती नसल्याने वाव मिळाला नाही,आता मात्र मोठी मागणी वाढली असून ऑर्डर वाढत आहे, यातून बराचसा आर्थिक फायदा होत आहे, स्वतःचे ब्रँड बाजारात आणल्याने गावाचा लौकिक वाढणार आहे. काही दिवसात आता मसाले निर्मिती करणार आहे. 
- बाळासाहेब कोथलकर, शेतकरी, तथा उद्योजक 

संपादन-प्रताप अवचार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer became an entrepreneur inspiring journey Kothalkar of Balsawangi Jalna news