परभणी जिल्ह्यात गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या 

Whats
Whats

देवगावफाटा: सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर, कुटुंबाच्या उदरनिर्वाहचा प्रश्न असाह्य झाल्याने शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.१२) दुपारी साडेतीनच्या सुमारास देवगावफाटा (ता.सेलू) येथे घडली. 

दगडोबा ज्ञानोबा मोरे (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दगडोबा मोरे यांच्यावर भारतीय स्टेट बँकेसह इतर कर्ज असल्याने नैराशातुन त्यांनी शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घराला आतुन कडी लावून पत्राखाली असलेल्या लाकडाला साडीचा दोर करून गळफास घेतला. पत्नीने आवाज देऊनही दार उघडत नसल्याने आरडाओरडा केल्यानंतर दाराची कडी तोडली असता दगडोबा मोरे यांचे शरीर लटकलेल्या अवस्थेत दिसुन आले. याबाबतची माहिती चारठाणा पोलिसांना दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रदिप आलापुरकर, ज्ञानेश्वर जाणकर, दत्ता गिराम, पवन राऊत यांनी पंचनामा केला. याप्रकरणी ज्ञानेश्वर मोरे यांच्या फिर्यादीवरून बँक कर्जाच्या नैराशातुन आत्महत्या केल्याचे कुटुंबातील सदस्यांनी पंचनाम्यात नमुद केले. शेवविच्छेदन सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुन असा परिवार आहे. 

एसटीच्या धडकेत वृध्द महिला ठार 
देवगावफाटा : एसटी बसच्या धडकेत गंभीर जखमी होऊन वृध्द महिला ठार झाल्याची घटना देवगावफाट्यावर शनिवारी (ता.१२) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नागरिकांनी बसचालकांविरूध्द रोष व्यक्त केला.दमयंती भिकाजी मस्के (वय ७० रा.पिंपरी गिते ता.जिंतूर) असे अपघातात ठार झालेल्या वृध्द महिलेचे नाव असून, या घटनेची नोंद चारठाणा पोलिस ठाण्यात झाली. (एमएच २० बीएल -३४९४) क्रमांकाची बस जिंतूरहून देवगावफाटामार्गे सेलूला जात होती. मात्र ही बस देवगावफाट्यावर आली असता, दमयंती मस्के ही वृध्द महिला रस्ता ओलांडताना बसची धडक लागल्याने बसखाली आली व यात महिलेच्या दोन्ही पायाला व विशेषत: डोक्याला मार लागल्याने महिला जागेवर बेशुद्ध झाली. महामार्ग पोलिस महेश पांगरकर, शेख शकील यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वृध्द महिलेला खासगी वाहनाने शासकीय रुग्णालयात पाठवले. मात्र, परभणी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी महिलेस मृत घोषित केले. 

युवकाच्या खूनप्रकरणी एक जण ताब्यात 
पूर्णा ः शहरात दिवसा उघड्यावर पाल पारधी समाजाच्या युवकाचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या चार आरोपीपैकी पूर्णा पोलिसांनी सिध्दाप्पा चपरु काळे यास सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून शनिवारी (ता.१२) रोजी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ व सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले. पूर्णा शहराच्या बाहेर लोहमार्गाच्या बाजुला पाल ठोकुन राहणाऱ्या सिध्दार्थ किशन काळे (वय २५) यांचा धारदार शस्त्राने वार करून चार आरोपातांनी (ता.१२) सप्टेंबर सायंकाळी सहाच्या सुमारास खून केला होता. त्यातील सिध्दाप्पा चपरु काळे या आरोपीतास सोलापुर पोलिसांच्या मदतीने मोहोळ येथुन ताब्यात घेतले. यामध्ये प्रवीण धुमाळ, चंद्रकांत पवार, गोवर्धन भुमे आदींनी काम पाहिले. 

रत्नापूर येथील अपघातात तरुणाचा मृत्यू 
मानवत ः मोटरसायकल बैलगाडीला धडकून झालेल्या अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर येथे शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. सारीपुत रावण धबडगे ( रा.बौध्द नगर, मानवत) असे मयत तरुणाचे नाव असून सदर तरुण शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास पाथरीहून मानवाच्या दिशेने येत होता. दुचाकी राष्ट्रीय महामार्गावरील रत्नापूर येथील टोल नाक्यावर आली असता पाठीमागून येणाऱ्या वाहनाने धक्का दिल्याने दुचाकी बैलगाडीवर जाऊन आदळल्याची माहिती प्रथमदर्शनी दिली. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी सातपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता. 

अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह वाळूसाठा जप्त 
गंगाखेड : उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी तालुक्यातील मरडसगाव येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व मौराळ सावंगी येथे असलेला वाळू साठा जप्त केल्याची कारवाई शनिवारी (ता.१२) रोजी पहाटे केली. पोलिस अधीक्षक यांच्याकडून होत असलेल्या कार्यवाहीमुळे वाळूमाफियांनी वाळू पुरवठा करण्यासाठी रात्रीचा सहारा घेतला आहे. या गोष्टीची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी शनिवारी पहाटे दोनच्या दरम्यान तालुक्यातील मरडसगाव येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून गंगाखेड पोलिस स्टेशन येथे जमा केले व मौराळसावंगी परिसरात पाहणी केली असता या ठिकाणी अंदाजे ५० ब्रास वाळूसाठा आढळून आला. सदरील वाळूसाठ्याचा पंचनामा करण्यात आला. 

गोदावरी नदीपात्रात आढळला मृतदेह 
ताडकळस ः पूर्णा तालुक्यातील बानेगाव येथील मारुती निवरती भोसले (वय ६०) हे (ता.११) रोजी संत मोतीराम महाराज दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येताना रात्र झाल्याने अंधारात पाण्याच्या उतार न कळल्यामुळे ते पाण्यात बुडाले. अंधार असल्यामुळे मयताचे प्रेत रात्री नातेवाईकांनी खुप शोधले, परंतू, ते सापडले नाहीत. १२ डिसेंबर रोजी मारुती निवृत्ती भोसले यांचे प्रेत नातेवाईकांना पाण्यावर तरंगताना सापडले. दुपारपर्यत कोणत्याही गुन्हा दाखल झाला नसल्याचे ग्रामस्थांकडुन समजले.  

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com