परतीच्या पावसाने शेतकरी सुखावला, सोयाबीन पिक बचावले

राम काळगे
Sunday, 11 October 2020

निलंगा तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची आशा भक्कम झाली असून बळीराजा सुखावला आहे.

निलंगा (जि.लातूर) : तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची आशा भक्कम झाली असून बळीराजा सुखावला आहे. लहान शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढून ठेवले असले तरी मोठ्या जमीनदार शेतकऱ्यांची या पावसामुळे तारांबळ उडाली आहे. तालुक्यात यंदा वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन हे पीक वेळेवर काढणीला सुरवात झाली.

उमरगा तालुक्यात जोरदार पाऊस; वीज कोसळून पाच जनावरांचा मृत्यू, पिकांचे नुकसान

यंदा बनावट बियाणे व सोयाबीन बियाणांच्या टंचाईमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ आली होती. त्यातच तालुक्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक शेतकऱ्यांनी काढून ठेवून गंजी लावले असून सोयाबीन सुरक्षित काढून ठेवल्यामुळे रब्बी हंगामातील पिक पेरणीसाठी सध्या पडत असलेला पाऊस पोषक मानला जात आहे.

 

उशिरा पेरणी झालेल्या व जमीनदार शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली असून त्यांचे सोयाबीन पीक सध्या रानावर भिजून जात आहे. तालुक्यात शनिवारपासून (ता.दहा) परतीचा पाऊस सुरू झाला असून निलंगा शहरासह केळगाव, खडकउमरगा, बसपूर, शिरोळ-वांजरवाडा, लिंबाळा, औराद शहाजानी, तगरखेडा, कासारशिरशी, हलगरा, आंबुलगा, झरी आदी भागांत जोरदार पाऊस झाला आहे.

पावसामुळे पिके हातची गेल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

या पावसामुळे रब्बी हंगामातील पिक नक्की हाताला लागेल अशी अशा शेतकऱ्यांना लागली असून आणखी असाच मोठा पाऊस झाल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. तालुक्यातील मांजरा व तेरणा नदीवरील बेरीज पूर्ण क्षमतेने भरले असून मसलगा मध्यम प्रकल्पही पूर्ण भरला आहे. शिवाय लघु प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ होण्याची गरज आहे.

रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, करडई या पिकाची पेरणी प्रामुख्याने शेतकरी करणार असला तरी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा गंजी लावून ठेवले आहेत. त्यांची रास करण्यासाठी पावसाने अडथळा निर्माण केला असून मोठ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन राणा वरती असल्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे.

मराठवाड्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, तीन महिला जखमी

विजेच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. शनिवार व रविवारी (ता.११) तालुक्यातील विविध भागात चांगला पाऊस झाला. जमिनीत ओलावा निर्माण झाल्यामुळे आता रब्बी हंगामासाठी शेतकरी पावसाने उघडीप दिल्यानंतर पेरणीची लगबग करणार असल्याचे दिसत आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Happy With Returned Monsoon In Nilanga Latur News