विक्रीअभावी जनावरांसमोर भाजीपाल्याचा चारा 

भगवान भुतेकर 
Saturday, 11 April 2020

आठवडे बाजार बंद झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा असल्याने दारोदार विक्री केली तरी कवडीमोल भाव मिळत आहे. परिणामी शेतकरी नाइलाजाने जनावरांना चारा म्हणून भाजीपाला टाकून देत असल्याचे दिसत आहे. 

‌रामनगर, (जि. जालना) -   कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान, जालना तालुक्यातील रामनगर येथील आठवडे बाजार बंद झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा असल्याने दारोदार विक्री केली तरी कवडीमोल भाव मिळत आहे. परिणामी शेतकरी नाइलाजाने जनावरांना चारा म्हणून भाजीपाला टाकून देत असल्याचे दिसत आहे. 

कोरोनाने जगभर थैमान घातले असल्याने सर्वत्र व्यवसाय धंदे बंद झाले आहेत. परिणामी रामनगरसह ग्रामीण भागातही शुकशुकाट दिसून येत आहे. रामनगर परिसरातील ५० खेडेगावांत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये वांगी, टोमॅटो, भेंडी, चवळी शेंगा, कोबी आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असून गावोगावचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. परिणामी हाती आलेल्या नगदी मालाची परिसरात विक्री होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रामनगर येथील आठवडे बाजारासह सर्वत्र व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी राहिली नाही.

हेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात 

बहुतांश शेतकरी दारोदार विक्री जरी करीत असले तरी भाजीपाला विक्रेत्यांची संख्या अधिक झाल्याने कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना शेतातील भाजी विक्री होत नसल्यामुळे नाइलाजाने चारा म्हणून जनावरांना टाकावा लागत आहे. त्यातच भाजीपाल्याचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली असल्याचे दिसून येत आहे‌. 

बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची मोठी आवक  

‌जालना -  जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शनिवारी (ता.११) शेकडो क्विंटल भाजीपाला, फळे, कांदा, बटाट्यासह हजारो क्विंटल अन्नधान्याची आवक झाली आहे. 
‌कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनामार्फत लॉकडाऊन करण्यात आले असून प्रशासनामार्फत सर्व त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. या कालावधीत नागरिकांना फळे, भाजीपाला, अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठीसुद्धा प्रशासनामार्फत व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शनिवारी  ६०० क्विंटल भाजीपाला, १५० क्विंटल फळे, ७० क्विंटल कांदे, बटाटे तसेच एक हजार ८४० क्विंटल अन्नधान्याची आवक झाली आहे. ‌यात जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६० टेम्पोद्वारे ६०० क्विंटल भाजीपाला, १५ टेम्पोद्वारे १२० क्विंटल फळे, सात टेम्पोद्वारे ७० क्विंटल कांदे तसेच बटाट्यांची आवक झाली आहे. 
तर भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ टेम्पोद्वारे २२९ क्विंटल तर जाफराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७० टेम्पोद्वारे एक हजार ५८९ ‌क्विंटल अन्नधान्याची आवक झाली आहे. ‌अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन टेम्पोद्वारे ३० क्विंटल फळे तर तीन टेम्पोद्वारे २२ क्विंटल अन्नधान्याची आवक झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in trouble