बीड जिल्ह्यात नवे पाच रुग्ण @६१

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

नोकरीसाठी, कामासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी बाहेर अडकलेल्यांना इच्छीतस्थळी जाण्याची परवानगी दिल्यानंतर मुंबईहून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळायला सुरुवात झाली. पाहता पाहता हा आकडा गुरुवारी (ता. २८) आढळलेल्या पाच नव्या रुग्णांसह ६१ वर गेला.

बीड: नोकरीसाठी, कामासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी बाहेर अडकलेल्यांना इच्छीतस्थळी जाण्याची परवानगी दिल्यानंतर मुंबईहून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळायला सुरुवात झाली. पाहता पाहता हा आकडा गुरुवारी (ता. २८) आढळलेल्या पाच नव्या रुग्णांसह ६१ वर गेला.

हेही वाचा-  व्हिडिओ पाहा : तब्बल सहा लाखांचे रॉमटेरियल जळून खाक

गुरुवारी आढळलेल्या पाच रुग्णांत पाटोदा शहरातील एक, याच तालुक्यातील कारेगावला तीन व धारुरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. परंतु, बुधवार (ता. २७) पासून आता रुग्ण बरे होण्याचाही सिलसिला सुरु झाला आहे. बुधवारी दोन कोरोनाग्रस्त जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर बरे झाल्यानंतर आता आणखी याच ठिकाणी दहा दिवस उपचारानंतर दोघे ठणठणीत झाले आहेत.

कवडगाव थडी (ता. माजलगाव) येथे ता. १८ मे रोजी आढळलेल्या दोन कोरोनाग्रस्तांना शुक्रवारी (ता. २९) डिस्चार्ज देण्यात येणार आहे. जिल्हा सुरुवातीच्या काळात कोरोनामुक्त होता. पिंपळा (ता. आष्टी) येथे आढळलेल्या रुग्णाची तपासणी व उपचारही नगरलाच झाल्याने त्याची नोंद जिल्ह्याच्या यादीत झाली नाही. मात्र, मुंबईहून येणाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे दिसू लागले. असेच पहिले दोन रुग्ण ता. १६ मे रोजी आढळले.

हे वाचलंत का? ६५ वर्षीय पत्नीला आधी काठीने मारले, पण जीव जाईना म्हणून...अखेर...

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगर जिल्ह्यातले एक कुटूंब मुंबईहून आष्टी तालुक्यातील नातेवाईकांकडे आले. या एकाच कुटूंबातील सात जणांना कोरोना असल्याचे निदान झाले. यातील वृद्धेचा मृत्यूही झाला. त्यामुळे हे रुग्ण देखील बीडच्याच यादीत पडले. दरम्यान, हळुहळु रुग्णसंख्या वाढत जाऊन शुक्रवारी ६१ वर पोचली. अंबाजोगाई वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रुग्ण आढळले आहेत. पण, रुग्ण वाढत असतानाच आता उपचारानंतर रुग्ण बरे होण्याची साखळीही सुरु झाली आहे.

सुरुवातीला सापडलेल्या इटकुर (ता. गेवराई) येथील मुलगी व हिवरा (ता. माजलगाव) येथील तरुणावर दहा दिवस जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर दोघेही कोरोनामुक्त झाले. त्यांना बुधवारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता ता. १८ रोजी कवडगाव थडी (ता. माजलगाव) येथे आढळलेल्या दोन रुग्णांवरही यशस्वी उपचारानंतर दोघेही बरे झाले आहेत. त्यांनाही शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

हेही वाचा-  पोलिस ठाण्यातच त्या दोघांचा विवाह, वाचा नेमके काय घडले

चार ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर उपचार
दरम्यान, जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ६१ असली तरी एकाचा मृत्यू, उपचारानंतर तिघांना डिस्चार्ज आणि सहा जणांवर पुण्यात उपचार सुरु आहेत. त्यामुळे सध्या ५१ जणांवर उपचार सुरु आहेत. यात बीडचे जिल्हा रुग्णालय, केज व परळीचे उपजिल्हा रुग्णालये व माजलगावचे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यात बीड जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या शुक्रवारी चार होईल.

आणखी पाच रुग्ण
गुरुवारी पाठविलेल्या ४१ स्वॅब नमुन्यांचे अहवाल सासंध्याकाळी प्राप्त झाले. यामध्ये ३६ अहवाल निगेटीव्ह तर पाच पॉझीटीव्ह आढळले. यामध्ये पाटोदा शहरातील एक, याच तालुक्यातील कारेगावला तीन तर धारूरला नवीन एक रुग्ण आढळला.

मागील दहा दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड कक्षात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना मागच्या तीन दिवसांपासून कुठलेही लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात येईल.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकीत्सक, बीड.

हेही वाचा- महत्त्वाची बातमी: कामगारांना पूर्ण पगार मिळालाच नाही, कोर्टाचे दरवाजे ठोठावले अन....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five CoronaVirus Positive Patient Found Today Beed News