Coronavirus : उस्मानाबादमधील जेवळी हादरले

सुधीर कोरे
शुक्रवार, 22 मे 2020

जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 23 वर पोचली आहे, त्यातील चार जणांवर यशस्वी उपचार करून घरी पाठविण्यात आरोग्य प्रशासनाला यश मिळाले. अजूनही 19 रुग्ण उपचार घेत आहेत.

जेवळी (जि. उस्मानाबाद) : जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत  आहे. जिल्ह्यातील जेवळी (ता. लोहारा) येथील रुग्णांच्या संपर्कातील चार लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. ज्याचा सर्वाधिक धोका आहे, ती बाब पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये घडल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी मध्यरात्री आलेल्या रुग्णांमध्ये फक्त वाशी येथील सहा वर्षांची मुलगी हीच नवा रुग्ण असून, बाकीचे पाच जण हे रुग्णाच्या संपर्कातील असल्याने आता चिंता वाढली आहे. दरम्यान, हे बाधित आता किती जणांच्या संपर्कात आले, याची माहिती आरोग्य विभाग घेत आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 23 वर पोचली आहे, त्यातील चार जणांवर यशस्वी उपचार करून घरी पाठविण्यात आरोग्य प्रशासनाला यश मिळाले. अजूनही 19 रुग्ण उपचार घेत असून, त्यातील एकाला सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये आजवर सापडलेल्या रुग्णांकडून संपर्कातील लोकांना संसर्ग झाला नसल्याचे दिसून आले होते. मात्र, गुरुवारी आलेल्या अहवालात रुग्णांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने आता काळजी घेण्याची गरज आहे. 

मुंबई, पुणे व अन्य हायरिस्क भागातुन आलेल्या लोकांची संख्या जिल्ह्यामध्ये मोठी आहे, साहजिकच त्या ठिकाणी प्रशासनाकडून व आलेल्या नागरिकांकडून अधिक दक्षता घेण्याची अपेक्षा आहे. बऱ्याचदा क्वारंटाइन केल्यानंतरही लोक बाहेर फिरताना दिसत असल्याने त्याचा धोका किती मोठा होऊ शकतो याचा अंदाज करणे अवघड आहे. 

नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 
 
जेवळीत नेमके काय झाले?
रिक्षा चालक असलेला जेवळी येथील ३० वर्षीय युवक गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई येथील कांदिवली परिसरात कुटुंबासह राहतो. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्याने तो शुक्रवारी (ता. १५) रात्री आठ वाजता आपल्या मूळगावी जेवळी येथे दोन ऑटोरिक्षांमधून कुटुंबातील आकरा जणांसह आला. त्या सर्वांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करून ग्रामपंचायत प्रशासनाने येथील बसवेश्वर विद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले होते. या युवकाला काही प्रमाणात ताप व सर्दीचा त्रास सुरू झाल्याने त्या रुग्णाचे स्वॅब तपासण्यासाठी पाठविले होते. बुधवारी (ता. २०) पहाटे दीड वाजता या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य प्रशासनासह पोलिस गावात पहाटेच दाखल होत संबंधित या रुग्णाच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या पंधरा व्यक्तींना ताब्यात घेऊन विलगीकरणाबरोबरच उपचार करून त्यांचे स्वॅब घेण्यासाठी लोहारा येथे पाठविण्यात आले होते.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

गुरुवारी (ता. २१) रात्री साडेअकरा वाजता त्या रुग्णाच्या कुटुंबातील पाठवलेल्या पंधरा स्वॅब नमुन्यांपैकी पत्नी, भाचा, मेव्हणा व १४ वर्षांची भाची अशी चार जणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याच कुटुंबातील पाठवलेले दोघांचे अहवाल हे संदिग्ध आल्याने आज या दोघांचे स्वॅब नमुने पुन्हा पाठविले जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी
डॉ अशोक कठारे यांनी आता येथे रुग्णांची एकूण संख्या पाच झाली आहे. 
 
१९३ ग्रामस्थ होम क्वारंटाइन
आरोग्य विभागाकडून प्रतिबंधित क्षेत्र तयार करून येथे घरोघरी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वे करण्यात येत असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. शेख यांनी दिली. आता ७ मेपासून बाहेरून आलेले १९३ जणांना क्वारंटाइन केले असून, यात येथील शाळेत ११४, घरात ६१ तर शेतात १८ जण विलगिकरणात आहेत, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी शिवानंद बिराजदार यांनी दिली. प्रशासनाच्या सूचनेनुसार गावात येणाऱ्या रस्त्यावर बॅरेकेटिंग करून जेवळी संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले तसेच संसर्ग वाढू नये म्हणून गावातील सर्व बँका, विविध कार्यालय, बाजारपेठ बंद ठेवल्याची माहिती सरपंच मोहन पणुरे यांनी दिली. दरम्यान या दोन
दिवसात खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे, तहसीलदार विजय अवधाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक चौरे, गटविकास अधिकारी अशोक काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए. पी. कठारे आदींनी जेवळीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

क्रिकेटपूर्वी सचिनने केलेय या चित्रपटात काम
 
सुटकेचा निःश्वास 
हे कुटुंब मुंबई येथून आल्यानंतर बसवेश्वर विद्यालयात विलगिकरणासाठी ठेवण्यात आले होते. यांना पाच सहा दिवस रोज डब्बा देण्यासाठी त्यांचे वडील व चुलते शाळेत जात होते. तिथे एकत्र जेवणाचा आनंदही ते घेत होते. येथून वडील व चुलते हे गावात व शिवारात जाऊन अनेका बरोबर उठ-बस केली होती. यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले
होते. आज या पंधरा जणात सुरवातीच्या रुग्णाचे वडील व चुलत्यांचा स्वॅब अवाहल हा कोरोना निगेटिव्ह आल्याने प्रशासन व गावातील नागरिक सुटकेचा निःश्वास सोडला.

तर संसर्ग रोखणे अशक्य
आतापर्यंत ग्रामीण भागामध्येच अधिक रुग्ण असल्याने त्यावर नियंत्रण मिळविणे शहराच्या तुलनेने सोप आहे. पण, याचा संसर्ग शहरातील रुग्णास झाल्यानंतर मात्र त्याचा संसर्ग रोखणे अधिक कठीण असणार आहे. ग्रामीण भागात कमी लोकसंख्येचा विचार करता संपर्कात आलेल्या लोकांना अधिक लवकर ओळखता येणे शक्य होते. उलट परिस्थिती शहरामध्ये असते,
संपर्कातील आलेली व्यक्ती ओळखीची असेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे हा संसर्ग समुहात मिसळणार नाही याबाबत प्रशासनाकडुन अधिक कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यातील शहरात आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील पहिले बारा अहवाल तरी निगेटिव्ह आल्याने काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मात्र, उमरगा येथील महिलेचे दोन अहवाल निगेटिव्ह निघाल्यानंतर तिसरा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने अधिक सतर्कता बाळगणे हिताचे ठरणार आहे. जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण सापडून घरी गेले व नंतरही जवळपास 37 दिवस कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात झालेला नव्हता मात्र आता जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five patients of Corona at Jewali Dist Osmanabad