मुलीचा विनयभंग करून पित्यास मारहाण; बीडमध्ये चौघांना शिक्षा 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड - अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या पित्यास मारहाण करणाऱ्या चौघांना न्यायालयाने दोषी धरत सहा महिने साधा कारावास आणि प्रत्येकी 24 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी सोमवारी (ता. 20) शिक्षा सुनावलेल्यांमध्ये विधिसंघर्षग्रस्त मुलाच्या पित्याचाही समावेश आहे. 

आष्टी तालुक्‍यातील एका गावात एक मे 2017 रोजी 13 वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी ध्वजवंदनासाठी आणून सोडले. ध्वजवंदन आटोपल्यावर मुलगी पायी घराकडे जात असताना 16 वर्षीय मुलाने ओढ्यात पाठलाग करून तिला गाठले. तिची ओढणी ओढून छेड काढली. यावेळी तिने पळत जऊन घरी वडिलांना हा प्रकार सांगितला. 

वडिलांनी रात्री साडेआठ वाजता गावातील स्थानकाजवळ "मुलीची झेड काढू नको' असे त्या मुलास बजावले. यावेळी मुलाचे वडील व इतर तिघांनी पीडित मुलीच्या वडिलांच्या जीपवर दगडफेक करून त्यांना दगड व लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. शिवाय गळ्यातील सात तोळ्यांची सोनसाखळीही लंपास केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलासह त्याचे वडील व इतर चौघे अशा पाच जणांवर विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमांद्वारे गुन्हा नोंद झाला. 

तत्कालीन फौजदार एस. डी. सिरसाट यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. अल्पवयीन मुलाच्या पित्यासह दिगंबर दत्तात्रय औटे, मारुती दत्तात्रय औटे, सचिन ऊर्फ अविनाश दिगंबर औटे यांना मारहाणीच्या गुन्ह्यात दोषी ठरवून सहा महिने साधा कारवास आणि प्रत्येकी 24 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन मुलाविरुद्ध बाल न्यायालयात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध; तसेच विनयभंगाचे प्रकरण प्रलंबित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com