बिबट्याच्या हल्ल्यात चार बकऱ्या ठार, सात बकर्‍या जखमी, करंजगाव शिवारात दहशत!  

karanjgaon.jpg
karanjgaon.jpg

करमाड (औरंगाबाद) : मागील काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याच्या घटनेने औरंगाबाद तालुक्यात भितीचे वातावरण आहे. यातच रविवारी (ता.29) पहाटे चार-सव्वाचारच्या सुमारास करजंगाव (ता.औरंगाबाद) येथील एका शेतवस्तीवरील बंदीस्त गोठ्यातील चार बकर्‍यांचा बिबट्याने फडशा पाडला. तर इतर सात बकर्‍या त्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, वनविभागाने मात्र तो तडस असल्याचे अनुमान काढले आहे.

मागील काही दिवसांपासून तालुक्यात वीजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे रविवारी करजंगाव येथील सुदाम यदु भेरे व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर भेरे हे दुचाकीवरून पहाटे चार वाजता दुध काढण्यापुर्वी पिकास पाणी देऊ या अनुषंगाने आपल्या शेतात पोहोचले. यावेळी त्यांनी बंदीस्त गोठ्यासमोर दुचाकी उभी केली. तर आतुन काही तरी आवाज आल्याने पाच फुटी चेनलींग जाळीतुन बॅटरीचा उजेड आत लावला असता त्यांना आत गोठ्यातील बकर्‍या हिंस्त्र प्राण्याने खाललेल्या अवस्थेत आढळून आल्या. याचवेळी गोठ्याच्या दुसर्‍या बाजूने या बिबट्याने उडी मारून पळ काढल्याचे त्यांना दिसले. श्री. भेरे बाप-लेकाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळावरून लागलीच घराकडे मोर्चा वळवत गावात ही घटना सांगितली. यावेळी पहाटेचे पाच वाजले होते. करजंगावचे पोलीस पाटील श्री. भेरे यांनी तात्काळ याबाबत करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी घटनेचे माहिती दिली. श्री. खेतमाळस यांनी वनविभागास याबाबत कळवून आपली एक टीम तातडीने करजंगाव येथे पाठवून घाबरलेल्या गावकर्‍यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 

सकाळी उजेडल्यानंतर शेजारी-पाजार्‍यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलीस व ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्या घेत घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता चार बकर्‍यांच्या नरडीचा घोट या बिबट्याने घेतल्याचे दिसून आले. तर अन्य सात बकर्‍या मरणावस्थेत होत्या. या घटनेत सुदाम भेरे या शेतकर्‍यांचे सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. यानंतर वनविभागाच्या एका पथकाने अपक्षेप्रमाणे थातुर-मातुर माहिती घेत पाहणी व पंचनामा करून तो बिबट्या नसुन तडस असल्याचे त्याच्या पायाच्या ठश्यावरून निश्चित करीत औरंगाबाद गाठले. दरम्यान, दिवसभर वनविभागाच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकार्‍याने घटनास्थळी भेट देऊन शेतकर्‍यांना धीर देण्याचा व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या भागाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व ग्रामस्थांना धीर दिला. 

दरम्यान, या घटनेने कार्‍होळ, आडगाव, वाकुळणी येथे बिबट्या दिसल्याच्या घटनेला एकप्रकारे बळ मिळाले असुन आता शेतर्‍यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच मागील काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकर्‍यांना रात्री अपरात्री पिकांनी पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. यातच आता बिबट्याच्या दहशतीने दिवसांही शेतात जाण्यास कोणी धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील पंधरवाड्यांपासुन शेती कामे खोळंबल्याचे चित्र आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे लाऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com