nurse
nurse

विधवा अन्‌ परित्यक्तांच्या जीवनात आशेचा किरण

लातूर : विधवा व परित्यक्ता महिलांच्या वाट्याला आलेले जिणं खूपच वाईट असतं. त्यात त्यांची आर्थिक स्थिती बिकट असेल तर मग संसाराचा गाडा ओढताना त्यांची खूपच कसरत होते. जीवन नकोशे होते. विधवांच्या या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणी तरी आधार दिला की त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होतो.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी अंशकालीन स्त्री परिचर पदाच्या भरतीप्रक्रियेत या महिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांना मोठ्या संख्येने संधी दिल्यामुळे त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या भरतीप्रक्रियेत डॉ. ईटनकर यांच्यातील माणुसकीचा प्रत्यय सर्वांना आला. 

71 पदांसाठी भरती
जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासून डॉ. ईटनकर यांनी ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा दर्जा वाढविण्यासाठी जीव ओतून प्रयत्न सुरू केले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर आहे. यामुळे आरोग्य केंद्रांनी कात टाकली असून, काही वर्षांत अनेक केंद्रांना राष्ट्रीय मानांकनही मिळाले आहे. केंद्रात पुरेशे मनुष्यबळ देण्याला त्यांचे प्राधान्य आहे. काही महिन्यांपूर्वी कंत्राटी परिचारिकांच्या नियुक्‍त्या केल्यानंतर परिचारिकांना मदत, स्वच्छता; तसेच अन्य कामे करण्यासाठी अंशकालीन स्त्री परिचर पदाची भरती त्यांनी हाती घेतली. विविध केंद्रांतील 71 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. सुमारे 475 महिलांनी अर्ज केले.

विधवा, घटस्फोटिता, परित्यक्त्यांना प्राधान्य

या सर्वांच्या मुलाखती डॉ. ईटनकर यांच्या अध्यक्षेखालील निवड समितीने 21 व 22 नोव्हेंबर रोजी घेतल्या. मुलाखतीला आलेल्या प्रत्येक महिलांची डॉ. ईटनकर यांनी माहिती घेतली. त्यांची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती, कामाची गरज आदी बाबी त्यांनी जाणून घेतल्या. यात त्यांनी विधवा, घटस्फोटिता व परित्यक्ता आदी वंचित महिलांना प्राधान्य दिले. निवड झालेल्या महिलांत 60 ते 70 टक्के अशा वंचित; तसेच उपेक्षित महिला आहेत.

यानिमित्ताने पहिल्यांदाच कोणी तरी परिस्थितीची जाणीव ठेवून आधार दिल्याचे या महिलांना वाटले. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून ही पदे आहेत. पूर्वी या पदासाठी दरमहा बाराशे रुपये मानधन होते. सध्या दरमहा तीन हजार रुपये मानधन असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

आर्थिक परिस्थितीचा विचार 
काही ठिकाणी एका पदासाठी दोन विधवांनी अर्ज केले होते. यावेळी डॉ. ईटनकर यांनी दोन्ही महिलांच्या कौटुंबिक तसेच आर्थिक स्थितीची माहिती जाणून घेतली. यात जमीन तसेच अन्य उत्पन्न किंवा उपजीविकेचे साधन नसलेल्या आणि कौटुंबिक आधार नसलेल्या महिलांना त्यांनी संधी दिली. दोन दिवस चाललेल्या या मुलाखतीत डॉ. ईटनकर यांनी दाखविलेल्या विधवा, परित्यक्ता व घटस्फोटिता महिलांबाबत दाखविलेला दृष्टिकोन सर्वांनाच सुखावून गेला. सर्व 71 पदांवर निवड झालेल्या महिलांची तात्पुरती यादी प्रसिद्ध झाली असून मूळ शैक्षणिक तसेच अन्य आवश्‍यक प्रमाणपत्रांची तपासणी झाल्यानंतर महिलांना नियुक्‍त्या देण्यात येणार आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com