कोरोनाच्या लढाईत खुशखबर...बीडमधील त्या मातांना संततीप्राप्तीचा आनंद

दत्ता देशमुख
Wednesday, 22 April 2020

केज तालुक्यातील कौडगाव येथील सखूबाई व बाळासाहेब किर्दंत या दांत्याला १३ वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा होता. ‘हम दो, हमारे दो’ असा त्यांचा सुखी संसार होता. सखूबाईंनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया देखील केली होती; परंतु त्यांचा सहा वर्षांचा मुलगा अपघातात मृत्युमुखी पडला आणि या कुटुंबावर आभाळच कोसळले.

बीड  - संततीप्राप्तीचा आनंद प्रत्येक स्त्रीला आयुष्यातील सर्वाधिक आनंद देणारा क्षण असतो. तसे कुटुंबाला देखील; परंतु कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर घडलेल्या विपरीत घटनेमुळे पुन्हा संततीप्राप्तीचा आनंद तिघींना मिळाला आहे. त्यांची गर्भनलिका पुनर्रचना शस्त्रक्रिया केलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी या मातांच्या आनंदला ‘कोरोनाच्या लढाईत उत्साह वाढविणारा क्षण’ अशी प्रतिक्रिया दिली. 

विशेष म्हणजे या तीनही शस्त्रक्रिया केजच्या उपजिल्हा रुग्णालयात झाल्या. दोन शस्त्रक्रिया झाल्या तेव्हा आताचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक होते. तर एका शस्त्रक्रियेवेळी जिल्हा शल्यचिकित्सक होते. त्यांनी शस्त्रक्रिया केल्या त्या तिन्हीवेळची पदे ही प्रशासनप्रमुख होती; परंतु या पदावर बसण्यापूर्वी ते शल्यविशारद (एम.एस.) व स्त्रीरोगतज्ज्ञ (डी.जी.ओ.) आहेत. पदापेक्षा आपण घेतलेले वैद्यकीय ज्ञान लोकांच्या कामी पडावे, या भावनेतून त्यांनी शस्त्रक्रिया केल्या. शिवाय अशा दुर्मिळ शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालयांत होणे हेही अपवादात्मकच आहे. 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

त्याचे झाले असे : केज तालुक्यातील कौडगाव येथील सखूबाई व बाळासाहेब किर्दंत या दांत्याला १३ वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा होता. ‘हम दो, हमारे दो’ असा त्यांचा सुखी संसार होता. सखूबाईंनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया देखील केली होती; परंतु त्यांचा सहा वर्षांचा मुलगा अपघातात मृत्युमुखी पडला आणि या कुटुंबावर आभाळच कोसळले. अशी शस्त्रक्रिया खासगी दवाखान्यातच शक्यतो होते. अन्यथा, मोठ्या शहरांतील शासकीय दवाखान्यांत. दोन्ही गोष्टी या दांपत्याला पेलण्यापलीकडच्या होत्या. त्यामुळे त्यांनी डॉ. थोरात यांना विनंती केली.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...

उपजिल्हा रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरेशी यंत्रसामग्री (स्कोप वगैरे) नव्हती; परंतु या दांपत्याला संततीप्राप्तीचे सुख मिळाले तर आपल्या वैद्यकीय पेशालाही आशीर्वाद मिळतील, या भावनेतून त्यांनी केजमध्ये गर्भनलिका पुनर्रचना शस्त्रक्रिया केली. दरम्यान, सध्या कोरोनाशी लढाई सुरू आहे. नागरी आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉ. अशोक थोरात यांच्या शिरावर मोठी जबाबदारी आहे. याच तयारीच्या बैठकीत असताना या दांपत्याने गोंडस मुलासह फोटो पाठविला.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

शस्त्रक्रियेचे यशस्वी परिणाम झाल्याचे कळल्यानंतर डॉ. अशोक थोरात यांनी ‘कोरोनाच्या लढ्यात उत्साह वाढविणारा क्षण’ अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, यापूर्वी झालेल्या केज येथील शबनम नबी मुल्ला व वाका (ता. परळी) येथील अनिता रमेश पांचाळ या महिलांच्याही गर्भनलिका पुनर्रचना शस्त्रक्रियेचे यशस्वी परिणाम दिसले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news even in the Battle of Corona