
ई-सेवापुस्तिकेसाठी `एनआयसी`ची मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली
लातूर : सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुंडली समजली जाणारी सेवापुस्तिका अर्थात सर्व्हिस बुक लवकरच ऑनलाईन होणार आहे. यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने (एनआयसी) मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस) विकसित केली असून या ई-सेवापुस्तिकेसाठी राज्य सरकारने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या तातडीने सेवापुस्तिका अद्ययावत (अपडेट) करण्यास सांगितले आहे. यासाठी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ३० सप्टेंबर तर क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १५ ऑक्टोबरची मुदत (डेडलाईन) दिली आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने पाच दिवसापूर्वी दिलेल्या या आदेशानंतर सरकारी कार्यालयात सेवापुस्तिका अद्ययावत करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. सेवापुस्तिका ही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेचा महत्वाचा अभिलेख (रेकॉर्ड) आहे. पुस्तिकेत नोकरीमध्ये रूजू झाल्यापासून निवृत्त होईपर्यंतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेशी निगडित सर्व नोंदी असतात. सेवा काळात घेतलेल्या रजा व शिल्लक रजा, पदोन्नती व निलंबनासह विविध कारवाईच्या नोंदी केल्या जातात. यामुळेच सेवापुस्तिकेला अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची कुंडली म्हणून ओळखले जाते. सेवापुस्तिकेतील नोंदी अद्ययावत नसल्यास निवृत्तीवेतन मिळण्यासाठी अडचणी येतात. यामुळे सेवानिवृत्तीच्या वेळी अनेकजण त्यासाठी धावपळ करतात.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
काहीजण सेवापुस्तिकेबाबत संवेदनशील राहून त्याची द्वितीयप्रत स्वतःकडे ठेवतात. यामुळेच सर्वांसाठी महत्वाची असलेली सेवापुस्तिका आता ऑनलाईन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी एनआयसीने विकसित केलेल्या एचआरएमएस प्रणालीत सेवापुस्तिकेतील नोंदी भरण्यात येणार आहे. यामुळेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवापुस्तिका अद्ययावत करण्यास सांगितले आहे. सेवापुस्तिका प्रणालीतून ऑनलाईन झाल्यानंतर सेवापुस्तिकेचे रूपांत्तर ई - सेवापुस्तिकेत होणार आहे. ती अधिकारी व कर्मचाऱ्यांना कधीही लॉगीन करून पहाता येणार असून त्याची प्रिंटही काढता येणार आहे. ई - सेवापुस्तिकेसाठी डिसेंबर २०१९ पर्यंतच्या सर्व नोंदी अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३० सप्टेंबर तर राज्यातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीतून लवरकच सेवापुस्तिकेचे रूपांत्तर लवकरच ई - सेवापुस्तिकेत होणार आहे. ई - सेवापुस्तिकेनंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व नोंदी ऑनलाईन होणार आहेत. यामुळे रजेचा अर्जही ऑनलाईन होणार असून त्याची मंजूरीही ऑनलाईनच मिळणार आहे. बायोमेट्रीक प्रणालीद्वारे रोजच्या उपस्थितीच्या नोंदीला सुरवात होणार असून ई - ऑफिस प्रणाली अधिक कार्यक्षम होणार आहे.
-बी. एस. दौलताबाद, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, एनआयसी, लातूर.
(संपादन-प्रताप अवचार)