कळमनुरीचे शासकीय क्‍वारंटाईन सेंटर फुल्‍ल

quarantine-center
quarantine-center

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मागील चार दिवसांत परराज्य व परजिल्ह्यातून कळमनुरी तालुक्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथील शासकीय क्‍वारंटाईन सेंटर फुल्ल झाले आहे. पुणे, मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांची दररोज वाढणारी संख्या पाहता आता कुठे व्यवस्था करावी या चिंतेत अधिकारी सापडले असून पर्यायी जागेचा शोध चालविला आहे.

कळमनुरी येथे मुलींच्या शासकीय वस्तीगृहात पन्नास खाटांचे क्‍वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहे. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना येथे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र मागील चार दिवसात मुंबई, पुणे, नाशिक येथून गावी परतणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. 

नागरिकांची आरोग्य तपासणी

मुंबई, पुणे येथून गावात आलेल्या नागरिकांची माहिती गावकरीच आरोग्य विभाग, पोलिस प्रशासनाला देताहेत. बाहेरून आलेल्या एखाद्या नागरिकापासून गावामध्ये आजाराचा संसर्ग पसरू नये, याकरिता आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना येथील क्‍वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करत आहेत.

प्रशासनासमोर अडचणींचा डोंगर 

 शासन निर्देशाप्रमाणे बाहेरून आलेल्या नागरिकांना येथे थांबविण्यात आल्यानंतर हे सेंटर पूर्ण क्षमतेने भरले झाले आहे. मात्र वाहतूक व्यवस्था बंद झाल्यानंतरही मुंबई, पुणे व परप्रांतातून चोरीछुपे पद्धतीने गावाकडे परतणाऱ्या नागरिकांची संख्या व त्या संदर्भात मिळत असलेल्या ग्रामस्थांच्या सूचना पाहता प्रशासनासमोर आता अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. या नागरिकांना आता कुठे ठेवायचे असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

पर्यायी जागेचा शोध

या बाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देऊन या संदर्भात माहिती दिली आहे. येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये क्षमतेच्या प्रमाणात नागरिकांना ठेवण्यात आले आहे. आता बाहेरून येणाऱ्या नागरिकांची कुठे आणि कशी व्यवस्था करायची असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी जागेचा शोध घेत जागा अधिग्रहित करण्याची तयारी चालवली असल्याची माहिती आहे.

आरोग्य केंद्रांना फवारणी मशीन द्याव्यात : खासदार हेमंत पाटील 

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात फॉगींग मशीन (औषध फवारणी यंत्र) तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सोयी सुविधा असणे आवश्यक

हिंगोली लोकसभा मतदार संघात हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुके, नांदेड जिल्ह्यातील चार ; तर यवतमाळ जिल्ह्यातील दोन तालुक्याचा समावेश आहे. मतदार संघाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने बहुतांश भाग आदिवासी बहुल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व सोयी सुविधा असणे आवश्यक आहे. 

फवारणी करणे महत्वाचे 

मात्र, बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांत सुविधांचा अभाव आढळून आला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी धूर व औषध फवारणी करणे महत्वाचे आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फॉगिंग मशिन्स उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com