
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी आपापल्या मूळगावातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकवले आहे.
उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी आपापल्या मूळगावातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकवले आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर गटाने गोवर्धनवाडी या त्यांच्या गावामध्ये सहा-तीन अशा फरकाने सत्ता राखत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या अगोदर राजेनिंबाळकरांच्या गटाची एकही जागा जात नव्हती. मात्र यंदा एका वॉर्डातील तीन जागा गेल्याने काही प्रमाणात खासदार गटाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
राजेनिंबाळकर यांचे वडील कै.पवन राजेनिंबाळकर यांचेही गावावर याच प्रकारे एकतर्फी वर्चस्व राहिलेले होते. त्यांच्या पश्चात ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही आतापर्यंत ही सत्ता टिकवून ठेवली आहे. यंदा काहीसा धक्का बसला असला तरी वर्चस्व कायम ठेवण्यात त्याना यश मिळाल्याचे दिसून येत आहे.दुसऱ्या बाजुला आमदार कैलास पाटील यांच्या कळंब तालुक्यातील देवधानोरा गावामध्ये नऊपैकी नऊ जागेवर एकतर्फी विजयश्री खेचून आणली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यामध्ये झालेल्या या लढतीमध्ये शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवित वर्चस्व सिध्द केले आहे.
आमदार होण्या अगोदर कैलास पाटील हे सांजा जिल्हा परिषद गटाचे सदस्य होते. अजूनही त्या ठिकाणी निवडणुक झालेली नाही. त्यामुळे त्या गटामध्ये कैलास पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न विरोधकाकडुन झाला होता. गटातील सांजा, चिखली, राजुरी, मेडसिंगा, सकणेवाडी या महत्त्वाच्या गावामध्ये त्यांनी गड राखल्याचे दिसुन येत आहे. यामध्ये चिखली व राजुरी येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून यश मिळाले आहे.
मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा
मात्र इतर गावामध्ये शिवसेनेच्या हातात ग्रामपंचायत राहणार आहे. या शिवाय तालुक्यामध्ये पंचायत समितीचे माजी उपउपसभापती शाम जाधव यांच्या वर्चस्वाला हादरा बसविण्यासाठी सज्ज झालेल्या विरोधकांना श्री.जाधव यांनी पराभवाची धुळ चारल्याचे दिसुन येत आहे. ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असल्याचे यावेळी शाम जाधव यानी सांगितले आहे.
संपादन - गणेश पिटेकर