greenary with sewage water
greenary with sewage water

गटारीच्या पाण्यातून फुलतेय हिरवळ

लातूर : गटारीतून वाहणारे अशुद्ध-काळ्या रंगाचे पाणी पाहिले की, आपोआप आपले हात नाकाकडे जातात. पण याच पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले आणि त्याचा पुनर्वापर केला तर... हा प्रयोग आता दुष्काळाशी सतत सामना करणाऱ्या लातुरातही शक्‍य झाला आहे.

सांडपाणी शुद्ध करणारा असा अनोखा प्रकल्प लातुरात सुरू झाला असून, यासाठी दयानंद शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, या पाण्यापासून झाडे आणि हिरवळ फुलवली जात आहे. 

दयानंद शिक्षण संस्थेचा पुढाकार
गेल्या काही वर्षांपासून लातुरात पुरेसा पाऊस झाला नाही. यंदाही तेच चित्र आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीला नागरिकांना दरवर्षी सामोरे जावे लागत आहे. सध्या लातूरकरांना दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. त्यामुळे लातूरकरांवर पाण्याचे संकट कायम आहे. हे चित्र काहीअंशी बदलण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची गरज आहे. ती ओळखून दयानंद शिक्षण संस्थेने जवळजवळ 16 लाख रुपये खर्च करून सेव्हेज ट्रीटमेंट हा प्रकल्प आपल्या संस्थेत उभा केला आहे.

असे होते शुद्धीकरण 

दयानंद शिक्षण संस्थेच्या आवारातील गटारातून जाणारे सांडपाणी अडविण्यात आले आहे. ते 35 हजार लिटरच्या टाकीत जमा केले जाते. त्यानंतर त्यावर सेव्हेज ट्रीटमेंट या प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. अवघ्या काही वेळातच काळेशार दिसणारे गटारातील पाणी शुद्ध, स्वच्छ बनत आहे. शुद्ध झालेल्या पाण्यासाठी 80 हजार लिटरची टाकी उभारण्यात आली आहे. त्यात हे पाणी साठवले जाते. हे पाणी पिण्यायोग्य नाही; पण झाडांना देण्यायोग्य असल्याचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे संस्थेतील क्रिकेट मैदानावरील हिरवळीला आणि संस्थेतील झाडांना हे पाणी दिले जात आहे. त्यामुळे इतर पाण्याची मोठी बचत होत आहे, असे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी "सकाळ'ला सांगितले. 

लातूरकरांनी अनुकरणे करावे 
पाणीप्रश्नाकडे गंभीरपणे पाहिले जावे म्हणून दयानंद शिक्षण संस्थेत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते मंगळवारी (ता. तीन) दुपारी चार वाजता होणार आहे. या उपक्रमाचे अनुकरण व्हावे म्हणून मंगल कार्यालय, हॉटेल, गार्डन, रुग्णालय, विविध शैक्षणिक-सामाजिक संस्था यांच्या प्रमुखांना या सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com