वैरागकर सरांनी, गावातील भिंतीनाही केले बोलकं ! 

अविनाश काळे
Wednesday, 23 September 2020

उमरगा तालुक्यातील दाबका जिल्हा परिषदेचे मुख्य सुभाष वैरागकर यानी शाळा बंद असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी गावातील सार्वजनिक ठिकाणावर शालेय साहित्य रंगविले आहे. ज्यामुळे खेळतांना ये-जा करताना या उपक्रमाचा लाभ होईल. एकाप्रकारे गावातील भिंती आता बोलू लागल्या आहेत. 

उमरगा (उस्मानाबाद) : कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालय बंद आहेत. शिक्षण पद्धती बंद आहे. लॉकडाऊन उठवण्यात येउन अनलॉक करण्यात आले असले तरी शाळा कुलुपबंद आहेत. शासनाच्या सुचनेप्रमाणे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरु करण्यात आला. असे असले तरी देखील गावातील सार्वजनिक ठिकाणच्या भिंती बोलक्या करत विद्यार्थ्यांसमोर शिक्षण अवगत करण्याचा अनोखा प्रयोग तालुक्यातील दाबका (ता.उमरगा) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी केला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सहा महिन्यापासून विद्यार्थ्यांना वर्गखोल्यातून मिळणारे ज्ञानार्जनाचे धडे मिळत नाहीत. कोरोनाने तशी परिस्थिती आणली आहे. ऑनलाईन शिक्षण तसेच दुरदर्शनवरील टीलीमीली या कार्यक्रमाद्वारे शिक्षण देण्याचा पर्याय समोर आणला. शासनाच्या योजनेला प्रतिसाद देत सर्वत्र शिक्षक व्हॉटसअप, झुम मिटिंग या तंत्रज्ञानानाचा वापर करून अध्यापन करत आहेत. मात्र यातही काही प्रमाणात मर्यादा येतात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे पालक आपल्या पाल्यांना मोबाईल घेऊन देऊ शकत नाहीत. तसेच ग्रामीण भागात मोबाईल रेंजचीही अडचण भासते. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासाला मर्यादा येत आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे या ऑनलाईन पद्धतीला पर्याय शोधण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक सुभाष वैरागकर यांनी सुरू केला. शाळेच्या इमारतीच्या भिंती अभ्यासक्रमाने रंगवून बोलक्या केल्या जातात. त्याप्रमाणेच श्री. वैरागकर यांनी कल्पकतेने व स्व:खर्चाने गावातील सार्वजनिक आणि जिथे विद्यार्थी खेळत असतात. अशा जागेतील भिंती अभ्यासक्रमाशी निगडित शैक्षणिक तक्ते, नकाशे, आकृत्या काढून रंगवून घेतल्या आहेत. यात इंग्रजी मुळाक्षरे, भाषा विषयाचे व्याकरण, भौमितिक आकृत्या, गणितातील सुत्रे, सिद्धांत, उजळणी, इतिहास, भूगोल व विज्ञान या विषयांवर आधारित तक्ते काढण्यात आले आहेत. पेंटर तानाजी गंगणे यांनी सुंदर हस्ताक्षरात हे काम केले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सरपंच बलभिम माने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंगद गायकवाड, उपाध्यक्ष अनुराधा  गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीतील शिक्षण तज्ञ प्रा. डॉ. शौकत पटेल आदींनी कौतुक केले.  

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

" अनेक उपक्रमशील शिक्षकांनी शाळेच्या अंतरंगासोबत इमारतीचे बाह्यांगही सुंदर करण्यासाठी इमारतीच्या भिंती बोलक्या केल्या. मात्र सद्यस्थितीत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती मिळाळी, मुले गावात खेळता-खेळता, सार्वजनिक नळावर पाणी भरतानाही भिंतीवरील मजकूर वाचावा. कोरोणाच्या काळातही विद्यार्थ्यांचा शिक्षणातला प्रवाह कायम रहावा या उद्देशाने गावातील भिंती शालेय अभ्यासक्रमाने रंगविलेल्या आहेत.

- सुभाष वैरागकर. मुख्याध्यापक 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Headmaster painted walls in village for education the students Umarga news