पत्रकारांना जोड्याने मारीनः दिलीप कांबळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

दानवे नंतर हिंगोलीच्या पालक मंत्र्यांची पुन्हा घसरली जीभ

दानवे नंतर हिंगोलीच्या पालक मंत्र्यांची पुन्हा घसरली जीभ

हिंगोलीः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता मंत्रिमंडळातले सामाजिक न्यायसारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले नेते दिलीप कांबळे यांनी पत्रकारांच्याविरोधात दमदाटीची भाषा वापरली. काही तक्रार असल्यास संवैधानिक पदावरच्या नेत्यानं संयमित भाषेतच उत्तर देणं अपेक्षित आहे. मात्र, जोड्याने मारा अशी मवाली भाषा मंत्र्यांना शोभते का हाच खरा प्रश्न आहे. या आधीही घाबरायला मी काही ब्राम्हण आहे का? असे जातीवाचक उद्गारही त्यांनी काढले होते. त्यावर वादळही झाले होते नंतर त्यांनी माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

एकाचे पाकीट दिले की, दुसऱ्याच्या विरोधात लिहितील अशा पत्रकारांना जोड्याने मारले पाहिजे. आपण दंडूक्‍यावाले पोलिस व पत्रकारांना भीत नाही, अशी टीका पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी तालुक्‍यातील खंडाळा येथे आज (शनिवार) केली. या प्रकाराने पुन्हा एकदा पालकमंत्री दिलीप कांबळे वादात सापडले आहेत. गेल्या दोन दिवसापासून पालकमंत्री दिलीप कांबळे हे शिवार संवाद कार्यक्रमासाठी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. ग्रामीण भागात विकास कामाची उदघाटने व शेतकऱ्यांच्या भेटीगाठीचे कार्यक्रम सूरु होते. त्यापैकी आज खंडाळा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, आपण दंडूकेवाले पोलिस व पत्रकारांना कधी भीत नाही. या उलट पोलीस अन् पत्रकार काय पाकीटे घेतली काही करतात. एकाचे पाकीट घेतील व दुसऱ्याच्या विरोधात बातम्या लिहितील अशा लोकांना जोड्याने मारले पाहीजे अशी टीका त्यांनी केली. खंडाळा येथे कार्यक्रमात ही टीका केल्यानंतर माध्यमामध्ये पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या विरोधात संताप सुरु झाला. मात्र, तोपर्यंत पालकमंत्री श्री. कांबळे हे दौरा आटोपून निघून गेले होते.

त्यानंतर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बाजू मांडण्यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बी. डी. बांगर यांनी तातडीने एक प्रसिध्दीपत्र काढून पालकमंत्र्याच्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचे म्हटले आहे. पालकमंत्र्यांना केवळ चुकीच्या पध्दतीने पत्रकारीता करणाऱ्याच्या बद्दल बोलले आहे ते सरसगट सर्व माध्यमांना लागू होत नाही. या उलट पालकमंत्र्यांना माध्यमामार्फत बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे, अशी पून्हा टीका माध्यमावरच केली. त्यामुळे हा वाद अधीकच वाढला आहे.

13 मार्च रोजी कांबळे ब्राह्मणांबद्दल काय बोलले होते ?
राज्यात दलालाची दलाली बंद झालीये. त्यामुळे काही जण शासनाला बदनाम करण्याचं काम करतात. काल एवढा चांगला कार्यक्रम झाला. या राज्यातल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला. त्यानंतर आम्ही निघून गेल्यानंतर घोषणाबाजी केली. हिंमत असेल तर माझ्यासमोर करा. मुस्काटात हाणले असते...मी ही दलित आहे मी काय ब्राम्हण आहे का ? हे सरकार दलालांच्या विरोधात आहे म्हणून काही जणांची पोटं दुखायला लागली.

ताज्या बातम्याः

Web Title: hingoli news minister dilip kamble talking about journalist