पाहुण्यांचा केला जातोय होम टू होम सर्व्हे

अविनाश काळे
शुक्रवार, 27 मार्च 2020

उमरगा शहरात अग्निशमन दलाच्या वाहनातूनही फवारणी केली जात आहे. तसेच परगावांहून आलेल्या प्रत्येकाची माहिती घेण्यासाठी ‘होम टू होम’ सर्व्हे सुरू आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा पालिका स्वच्छतेच्या कामासाठी लाखो रुपये खर्च करतेय; मात्र त्याचा फायदा मर्यादितच होतो. आपत्कालीन काळात स्वच्छतेची मोहीम गतीने करण्यासाठी सक्षम यंत्रणा, आधुनिक यंत्रसामग्री नसल्याने कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी अडचणी येताहेत. दरम्यान, शेतात लहान ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणीच्या यंत्रसामग्रीचा पर्याय पालिकेला उपलब्ध झाला असून त्याद्वारे औषध फवारणीचे काम सुरू आहे. मोठ्या रस्त्यालगत अग्निशमन वाहनातील पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून त्याची फवारणी सुरू करण्यात आली.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

पालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत गांभीर्य नसते. महिन्याकाठी १८ लाखांचा खर्च होऊनही शहरात अस्वच्छता कायम असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेला स्वच्छतेच्या कामाची जाग आली आहे. मुख्याधिकारी प्रकाश पाटील, आरोग्य निरीक्षक एम. आर. शेख यांच्यासह अभियंते, कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या कामाकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. जर्मिक्लीन लिक्विडचे पाण्यात मिश्रण करून लहान ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्याची फवारणी केली जातेय.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

अग्निशमन वाहनातील पाण्याच्या टाकीची क्षमता दहा हजार लिटर आहे. त्यात पाच पोती ब्लिचिंग पावडर टाकून त्याची फवारणी राष्ट्रीय महामार्गालगत करण्यात आली. दरम्यान, औषध फवारणीची मोहीम सुरू झाल्याने घरी बसलेल्या नगरसेवकांना जाग आली आहे. आता आपापल्या प्रभागात ही मोहीम राबविण्यासाठी ते प्रयत्न करताहेत. 

परगावांहून आलेल्यांची घेतली जातेय माहिती 
कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीने बाहेरगावी, परदेशात कामासाठी राहिलेले अनेक जण शहरात परतले आहेत. स्वतःची काळजी असणारे बरेच जण तपासणी करून घेताहेत पण ज्यांना स्वतःबरोबरच कुटुंब व समाजाची काळजी नाही ते माहिती दडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरात दाखल झालेल्या अशा व्यक्तींचा होम टू होम सर्व्हे करण्यासाठी मुख्याधिकारी श्री. पाटील यांनी पथक नेमले आहे. एका विशिष्ट नमुना फॉर्मवर अशा व्यक्तींची माहिती भरून घेतली जातेय; शिवाय ही सोय घरबसल्या उपलब्ध होण्यासाठी ऑनलाइन माहिती देता येते. त्यासाठी पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home-to-home surveys are conducted by guests