प्रशासनाला चकवा देत 'होम आयसोलेशन' रुग्ण फिरतात गावभर, संसर्गाचा धोका !

अविनाश काळे
Monday, 21 September 2020

उमरगा : पॉझिटिव्ह आलेल्या एका सराफ व्यापाऱ्याने चक्क दुकान उघडले ; गर्दीच्या ठिकाणातुन संसर्गाला मिळेतय आमंत्रण ! 

उमरगा (उस्मानाबाद) : कोरोना संसर्गाने नागरिकामध्ये भययूक्त वातावरण निर्माण केले असताना गर्दीच्या ठिकाणी नागरिकाकडून योग्य ती दखल घेतली जात नाही, शिवाय संसर्ग झालेले व्यक्तीच बिनधास्तपणे बाहेर पडत असतील तर संसर्गाचा टक्का वाढतच रहाणार आहे. प्रशासनाकडून होम आयसुलेशन असलेल्या व्यक्तीच्या गृही भेटी केल्या जात असल्या तरी कांही महाशय चकवा देऊन घराच्या बाहेर पडताहेत. सराफ लाईनमधील एका संसर्ग झालेल्या व्यापाऱ्याने शनिवारी (ता.19) दुकान उघडले, याची माहिती पालिकेकडे गेल्याची कुणकुण लागताच त्या व्यापाऱ्याने दुकानाचे शटर कुलुपबंद करून पोबारा केला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उमरगा शहर व तालुक्यात पाच महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये संसर्ग झपाट्याने पसरल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. 83 दिवसात एक हजार 623 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. त्यात शहरात 765 तर ग्रामीणमध्ये 856 रुग्ण होते. आत्तापर्यंत मृत्यूची संख्या 42 पर्यंत पोहचली आहे. उपचाराने व मोठ्या हिमतीने आत्तापर्यंत बाराशे लोकांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जवळपास साडेतीनशे लोकावर उपचार सुरू आहेत. 

133 जण होम आयसोलेशनमध्ये
शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पॉझिटिव्ह रुग्णांना घरातील सोयीनुसार औषधोपचार घेता येत असल्याने सध्या 133 जण घरात राहुन औषधोपचार घेत आहेत. मात्र त्यातील कांही मोजके लोक घराबाहेर फिरत असल्याने संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. शनिवारी संसर्ग झालेला एक सराफ व्यापारी चक्क दुकान उघडून बसला होता, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याना याची माहिती मिळताच कर्मचारी त्या ठिकाणी गेला तो पर्यंत तो व्यापारी निघून गेला होता. दरम्यान होम आयसुलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीवर देखरेख करण्याचे पालिका कर्मचारी व कांही शिक्षकांना दिले आहे मात्र या कामात ढिलाई होत असल्याने संसर्ग वाढत असल्याची चर्चा होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढतेय !
शहरातील व ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या कांही लोकांना कोरोना संसर्गाची थोडीही भिती वाटत नाही. माझ्या शरीरात कोरोना येऊन गेला अशा अविर्भावात कांही जण तोंडाला मास्क ना रूमाल न बांधता फिरताहेत. दरम्यान पोलिस यंत्रणेने मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाईची मोहिम कांही मर्यादित वेळेपुरती केली जात आहे. पालिकेच्या पथकाच्या कारवाईतही ढिलाई दिसून येत आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Isolation Patients Violate Rules Umarga News