
लातूर जिल्ह्यातील १४२ प्रकल्पात सहाशे दशलक्षघनमीटर पाणीसाठा
लातूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने काही भागात अतिवृष्टी झाली. पण, लातूर व रेणापूर या दोन महत्त्वाच्या तालुक्यात मात्र पहिल्यापासून जोरदार पाऊस झाले नाहीत. त्यात आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्प भरण्याच्या आशा मावळल्या आहेत. जिल्ह्यात असलेल्या मोठे, मध्यम व लघू अशा एकूण १४२ प्रकल्पांत सहाशे दशलक्षघनमीटर पाणीसाठा झाला आहे. याची टक्केवारी ८९ इतकी आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेले मांजरा व निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प आहेत. यावर्षी हे दोनही प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. ओव्हर फ्लो झाल्याने दोनही प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाणी नदीच्या पात्रात सोडून देण्यात आले होते. हे दोनही प्रकल्प भरल्याने जिल्ह्याच्या काही भागाची पिण्याची व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाचा प्रकल्पीय साठा १२२.१५ दशलक्षघनमीटर आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सध्या या प्रकल्पात ८२.८८ दशलक्षघनमीटर पाणीसाठा आहे. याची टक्केवारी ६७.८५ इतकी आहे. यात लातूर तालुक्यातील तावरजा प्रकल्पात केवळ १९.४२ टक्के पाणीसाठा आहे. रेणापूर तालुक्यातील व्हटी प्रकल्पात २६.९३ टक्के तर रेणा प्रकल्पात २९.१४ टक्केच पाणीसाठा आहे. पावसाळा संपल्याने हे तीनही प्रकल्प भरण्याची आशा आता मावळल्या आहेत. उदगीर तालुक्यातील तिरू प्रकल्पांत ८५.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा हे चारही प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. जिल्ह्यात १३२ लघू प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पात सध्या ७८.४० टक्के पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पातीलदेखील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता धूसर आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू असे एकूण १४२ प्रकल्प आहेत. त्याचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा ६९५.५१ दशलक्षघनमीटर इतका आहे. सध्या या सर्व प्रकल्पांत ५९९.४६ दशलक्षघनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. याची टक्केवारी ८६.१९ इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही यावर्षी रब्बीच्या पिकांनाही या पाण्याचा फायदा होणार आहे.
(संपादन-प्रताप अवचार)