मी एमजीएम कुटूंबाचा भाग इथे तर गुणवत्तेचा डोंगर - शरद पवार 

sharad pawar
sharad pawar

औरंगाबाद : एमजीएम या कुटूंबाचा मी एक भाग झालोय, याचे कारण इथे गुणवत्तेचा डोंगर आहे. यात कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. त्यामुळेच त्यांचे कर्तृत्व इथल्यापुरते मर्यादित नाही. नामांकित संस्था म्हणून एमजीएमचे दाखले मिळत आहेत. असे गौरवोद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी कदम परिवाराबद्दल काढले. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सत्कारानिमित्त शुक्रवारी (ता. 20) रुक्‍मिणी सभागृहात श्री. पवार बोलत होते. 

एमजीएममधील सभागृहात शिल्पकार या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. शरद पवार यांच्याहस्ते श्री. कदम आणि अनुराधा कदम यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांची उपस्थिती होती. 

...म्हणून तत्काळ हो म्हणालो 
श्री. पवार म्हणाले, राजकारणात माणसे सांभाळताना समारंभ, कौतुक, अवास्तव गुण चिकटावे लागत असल्याने हो नाही सुरु असते. पण अंकुशरावांच्या सत्कारासाठी मी पटकन हो म्हटलो. कारण निर्मितीचा आनंद घेण्यासाठी ज्यांनी उभे आयुष्य दिले, अशा व्यक्‍तींचा गौरव करावा लागेल, याचसाठी मी आलो.

कमलबाबूंचे प्रशासन, मित्रांचे हात, अंकुशरावांची साथ यातून एमजीएम उभारले. त्यावेळी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि त्याला गुणवत्तेची गरज होती, ती इथे पहायला मिळते. मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्या रयतमध्येही सामजिक जाण ठेवली जाते. 

शेजारचे पंतप्रधानही पत्र मागतात 
सार्वजनिक जीवनात चांगले काम करायचे, लोकात रहायचे असेल तर, वैयक्‍तिक आयुष्य स्वच्छ ठेवले पाहिजे, सोबत घरची एक व्यक्‍ती असायला हवी. ही संधी कमलबाबूंप्रमाणे आप्पासाहेब पवारांच्या रुपाने मलाही मिळाली.

एमजीएमने देशातच नव्हे तर परदेशातही एवढी ख्याती मिळवली आहे कि, आम्हाला जूनमध्ये शेजारच्या देशातील पंतप्रधानही एमजीएम प्रवेशासाठी शिफारस करायला लावतात. संस्थेची नोंद देशाबाहेरही घेत असल्याने ती आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. असे श्री. पवारांनी सांगितले. 

सगळे प्रस्ताव मान्य करायचो 
श्री. वळसे म्हणाले, शिक्षणमंत्री असताना 30-35 प्रस्ताव घेऊन कमलबाबू यायचे. त्यातील एकही मागे ठेवता येत नव्हता कारण दर्जेदार शिक्षणाला इथे महत्व आहे. अशा मोजक्‍याच संस्था आहेत. विशेषत्व असलेले विद्यापीठ निर्माण झाले, आनंदाची बाब आहे. यावेळी कमलकिशोर कदम यांनी हात, बुद्धी, हृदय ओतून बाबुराव यांनी जे काम हातात घेतले ते परिपुर्ण केल्याचे सांगितले. आमदार राजेश टोपे, सतीश चव्हाण, रंगनाथ काळे, कैलास पाटील यांची उपस्थिती होती. सन्मानपत्राचे वाचन निलेश राऊत यांनी केले. गौरव समितीचे अध्यक्ष आमदार काळे यांनी प्रस्तावना केली. 

मराठवाडा मागास नाही.. 
मराठवाडा मागास आहे. असं कुणी म्हटले कि, मला वाईट वाटते. हा भाग मागास नाही तर, इथे कर्तृत्ववान पिढी आहे. बाहेर देशात अनेकांना भेटण्याचा प्रसंग येतो तेव्हा, त्यातील बहुतांश मराठवाड्यातील असतात. कर्तृत्ववान फक्‍त पुणे, मुंबईतच आहेत, असे नाही. इथल्या कर्तृत्वालाही महाराष्ट्राने न्याय दिला पाहिजे. उद्धवराव पाटील यांचा दाखला देत संसदीय हातखंडा आणि सामान्य प्रश्‍नांची जाण याबाबत त्यांचा हात कुणीही धरु शकत नव्हते, असे श्री. पवार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com