जालन्यासह ठिकठिकाणी हातभट्ट्यांवर छापेसत्र 

उमेश वाघमारे 
Tuesday, 28 April 2020

स्थानिक पोलिस ठाण्यांकडून आता हातभट्ट्यांवर छापे टाकण्यास सुरवात झाली आहे. कदीम जालना पोलिसांनी मंगळवारी (ता.२८) शहरातील कैकाडी मोहल्ला येथे छापा टाकून तब्बल तीन हाटभट्ट्या उद्धवस्त करत सव्वालाखांची गावठी दारू व रसायन नष्ट केले आहे.

जालना - स्थानिक पोलिस ठाण्यांकडून आता हातभट्ट्यांवर छापे टाकण्यास सुरवात झाली आहे. कदीम जालना पोलिसांनी मंगळवारी (ता.२८) शहरातील कैकाडी मोहल्ला येथे छापा टाकून तब्बल तीन हाटभट्ट्या उद्धवस्त करत सव्वालाखांची गावठी दारू व रसायन नष्ट केले आहे. तर दारू बंदी विशेष पथकासह तालुका जालना पोलिस, गोंदी पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून हातभट्ट्या उद्धवस्त केल्या आहेत. 

लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सर्व उद्योग, बाजारपेठेसह मद्य विक्री बंद आहे. मात्र, शहरासह जिल्ह्यात लॉकडाउन दरम्यानही हातभट्ट्या सुरू आहेत. या हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेसह विशेष पथकाकडून सतत छापे टाकरण्यात येत आहेत. मात्र, स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी या हातभट्ट्यांकडे लक्ष देण्यास तयार नव्हते. या संदर्भात 'सकाळ'ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता स्थानिक पोलिस ठाण्याकडून त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर छापे टाकण्यास सुरवात केली आहे. 

हेही वाचा : नवऱ्याला भांडून गेली, कोरोनाला सापडली

कदीम जालना पोलिसांनी शहरातील कैकाडी मोहल्ला येथे मंगळवारी (ता.२८) छापा टाकून तब्बल तीन हातभट्ट्या उद्धवस्त केल्या. यावेळी एक लाख ११ हजार ५०० रुपयांची गावठी दारूसह रसायन नष्ट करण्यात आले. तसेच संशयित कैलास धोंडीराम जाधव, मगन लोकनाथ पवार या दोघांसह एका महिलेला कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच ट्रमसह इतर साहित्य ही पोलिसांनी जप्त केले आहे. 

हेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री

तालुका जालना पोलिसांनी व विशेष पथकाने मंगळवारी (ता.२८) सिद्धार्थनगर येथे छापा टाकून तब्बल ३८ हजार ५०० रुपयांचे रसायन व साडेतीन हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली. या प्रकरणी संशयित संतोष सुरेश गायकवाड याला पोलिसांनी पकडले असून या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दारू बंदी विशेष पथकाने कैकाडी मोहल्ला येथे छापा टाकून एक हजार रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे. 
गोंदी पोलिसांनी मंठतांडा येथील गायरान जमिनीवर सुरू असलेल्या हातभट्टीवर सोमवारी (ता.२७) छापा टाकला. यावेळी संशयित अंबादास सोनाप चव्हाण, प्रकाश धारू राठोड, रवी किसन आढे, शरद राठोड (सर्व रा. मंठतांडा ता. अंबड) यांच्या विरोधात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal liquor seized in Jalna

Tags
टॉपिकस
Topic Tags: