esakal | सालगड्यानेच मारला शेतकऱ्याच्या घरात डल्ला, लातूरातील घटना!
sakal

बोलून बातमी शोधा

crime news 1.jpg

 स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला छडा. 

सालगड्यानेच मारला शेतकऱ्याच्या घरात डल्ला, लातूरातील घटना!

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : मुरढव (ता. रेणापूर) येथील शेतकरी धनराज गोविंदराव देशमुख यांच्या घरी भरदिवसा झालेल्या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. यात देशमुख यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या प्रदीप उर्फ बाळू अरविंद अहिलवाड यानेच ही चोरी करत मालकाच्या घरात डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सालगड्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीला गेलेल्यापैकी काही दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


पोलिसांनी सांगितले, की मुरढव येथील शेतकरी धनराज देशमुख हे 30 सप्टेंबर रोजी लातूरला आले होते. तर त्यांचे कुटुंबिय गावाला गेले होते. दुपारी सव्वाबारा ते पावणेचार दरम्यान अज्ञात चोरट्याने माळवद व स्लॅबमधील फटीतून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी व लाकडी आलमारीचे कुलूप तोडून त्यातील रोख एक लाख रूपये व 63 हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे चोरून नेले. या प्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लक्ष घालण्याचे आदेश पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले. त्यानंतर केलेल्या तपासात पोलिसांना ही चोरी देशमुख कुटुंबियांशी सतत संपर्कात असलेल्या व्यक्तीनेच केल्याचा संशय बळावला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

घरात प्रवेश करण्यासाठी चोरट्याने माळवद व स्लॅबमधील घरातील व्यक्तीशिवाय कोणालाच माहिती नसलेल्या फटीचा वापर केल्यामुळे या संशयाला पुष्टी मिळाली. यामुळे पोलिसांनी देशमुख यांच्या शेतातील सालगडी प्रदिप अहिलवाड याच्यावर नजर ठेवली. गुप्त बातमीदारानेही त्यानेच चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (ता. 20) प्रदिपला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याचे कबुल करून चोरलेले 59 हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख 42 हजार सातशे रूपये काढून दिले. हा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी प्रदीपला रेणापूर पोलिसांच्या हवाली केले आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुनिल रेजीतवाड, पोलिस उपनिरीक्षक एल. जी. कोमवाड, जमादार संजय भोसले, नाईक रामहरी भोसले, प्रकाश भोसले व सचिन मुंडे यांनी पुढाकार घेतला. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)