लातूरात कोरोनासुराचा कहर, नऊ हजारांवर बाधित, सप्टेंबरही ठरला 'डेंजर' 

हरी तुगावकर
Sunday, 4 October 2020

सप्टेंबर ठरला धोकादायक; उपाय योजनांची हवी अंमलबजावणी 

लातूर : पाच महिन्यांपूर्वी केवळ १६ कोरोनाचे रुग्ण असलेल्या जिल्ह्यात आता साडेसतरा हजारांवर रुग्णांची संख्या गेली आहे. यात गेल्या सहा महिन्यांत सप्टेंबर हा सर्वाधिक धोकादायक ठरला आहे. या एकाच महिन्यात नऊ हजार १८८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रोज ही संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना संबंधीच्या उपाय योजनांची कडक अंमलबजावणीची गरज आहे; तसेच नागरिकांनीही निष्काळजीपणालाही आवर घालण्याची गरज आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यात मार्चमध्ये एकही रुग्ण नव्हता. एप्रिलमध्ये मात्र सुरवातीला हरियानावरून आलेले आठ रुग्ण निलंग्यात आढळून आले. त्यानंतर उदगीरमध्ये काही रुग्ण समोर आले. एप्रिलमध्ये जिल्ह्यात केवळ १६ रुग्ण होते. त्यानंतर कडक लॉकडाउन सुरू झाला. त्यामुळे मेमध्ये केवळ ११९ रुग्ण आढळून आले. जूनमध्ये यात थोडी वाढ झाली. या महिन्यात २१४ जण कोरोनात बाधित झाले. जुलैमध्ये मात्र हजाराचा आकडा पार झाला. या महिन्यात एक हजार ८५१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ऑगस्ट धोकादायक ठरला. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.

त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पाच हजार ९११ जणांना कोरोनाची लागण झाली. ऑगस्टच्या तुलनेत तर सप्टेंबर अधिकच धोकादायक ठरला आहे. दररोज सरासरी अडीचशे ते तिनशे जणांना कोरोनाची लागण झाली. ता. आठ सप्टेंबरला तर एकाच दिवशी सर्वाधिक ५१५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. सप्टेंबर या एकाच महिन्यात नऊ हजार १८८ जण कोरोनाने बाधित झाले आहेत. या महिन्यात रोज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण बाधितांचा आकडा साडे सतरा हजारावर गेला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शहरात शारीरिक अंतराच्या नियमाचे सातत्याने नागरिकांकडून उल्लंघन होताना दिसत आहे. अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नागरिकांची निष्काळजीपणादेखील रुग्णांची संख्या वाढीस कारणीभूत ठरत आहे. राज्यात एक रुग्ण सापडला नाही असा गवगवा करणाऱ्या लातूर महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत सहा हजार ६१३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोना संबंधीच्या उपाय योजनांची पुन्हा एकदा कडक उपाय योजना करण्याची गरज आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आकडे बोलतात 

  • एप्रिल---१६ 
  • मे------११९ 
  • जून----२१४ 
  • जुलै----१८५१ 
  • ऑगस्ट--५९११ 
  • सप्टेंबर---९१८८ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase of nine thousand corona patients in September month Latur news