उस्मानाबाद : इट, पारगाव मंडळात अतिवृष्टी, दुबार पेरणी केलेले सोयाबीन गेले वाहून 

सयाजी शेळके  
मंगळवार, 30 जून 2020

जिल्ह्यातील इट (ता. भूम) महसूल मंडळ आणि पारगाव महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे दुबार पेरणी केलेले सोयाबीन पावसात वाहून गेले आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील इट (ता. भूम) महसूल मंडळ आणि पारगाव महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे दुबार पेरणी केलेले सोयाबीन पावसात वाहून गेले आहे. तर कसबे तडवळे (ता. उस्मानाबाद) परिसरात धुवाधार पाऊस झाला. मात्र अत्यंत कमी नोंदवला गेला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र जेमतेम पाऊस झाला आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

 
भूम तालुक्यातील इट परिसरात काल दुपारी चारच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात संततधार सुरू असलेल्या पावसाने थोड्या वेळातच धुवाधार बॅटींग सुरु केली. दोन तासांमध्ये इट आणि परिसरात पाणीच पाणी पाहायला मिळाले. गेल्या अनेक वर्षांतील हा अल्प कालावधीतील विक्रमी पाऊस मानला जात आहे. या पावसाने लेंडी, मांजरा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. तर छोटे-मोठे बंधारे ओव्हरफ्लो झाले.  शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकाची नासाडी झाली आहे. तब्बल शंभर मिलिमीटर पावसाची नोंद या महसूल मंडळात झाली आहे. तर जवळच असलेल्या अन्य काही मंडळात मात्र जेमतेम पाऊस झाला आहे.  

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

वाशी तालुक्यातील पारगाव महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला आहे. या महसूल मंडळात ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यावर पुन्हा एकदा संकट आल्याचे चित्र आहे. आता तिसऱ्यांदा पेरणी करावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतातूर झाली आहेत. शेतात बहुतांश ठिकाणी पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणच्या शेतीचे बांध फुटल्याने काळी माती वाहून गेली आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

कसबे तडवळे पावसाची नोंद नाही
 कसबे तडवळे (ता. उस्मानाबाद) येथे काल चारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावाच्या परिसरातील नद्या, नाले ओसंडून वाहत होते. अनेक ठिकाणची रस्ते बंद झाले होते. शेतकऱ्याच्या शेताचे बांध फुटले दुबार पेरणी केलेले सोयाबीन या पावसाने वाहून गेले. मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असतानाही शासनदरबारी मात्र याची अत्यल्प नोंद घेण्यात आली आहे. कसबे तडवळा हे गाव डोकी महसूल मंडळात येते. मात्र महसूल मंडळाच्या अन्य गावात अत्यंत कमी पाऊस झाल्याने या मंडळात केवळ २१ मिलिमीटर पाऊस झाला असल्याची नोंद सरकार दप्तरी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्जन्यमापकाची  प्रक्रिया चुकीची असल्याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It Pargaon Mandal Heavy rains in Osmanabad district