जळकोटच्या कोवीड सेंटरमध्ये गलथान कारभार..वाचा काय घडला प्रकार

शिवशंकर काळे 
Thursday, 13 August 2020

कोरोनाबाधित रुग्णांनी मांडली समस्याची व्यथा.  
तहसीलदारांकडे तक्रार केली तर म्हटले तुमच्यापुरते बोला विनाकारण वाद घालू नका

जळकोट (जि.लातूर) : गेल्या पंधरा दिवसापासून जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. म्हणुन जळकोट येथे कोरोना रुग्णासाठी कोविड सेंटर बनवण्यात आले आहे. पण गुरुवारी या कोविड सेंटर मधील प्रशासनाचा गलथान कारभार एका कोरोनाबाधित महिलेने उघडकीस आणला आहे. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

कोविड सेंटर मध्ये रुग्णांना कसल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत. ४८ तास उलटुन गेले तरीही कुणीही चेकअप साठी येत नाहीत. कोविड सेंटर मध्ये शुगर, बीपी चे आजार असलेले रुग्ण सुद्धा आहेत. त्या रुग्णांची विशेष काळजी घेणे गरजेचे असताना, त्यांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. या रुग्णांना जेवण सुध्दा वेळेवर दिले जात नाही. दुपारी चारच्या सुमारास अनेक वेळा जेवणाची मागणी केल्यानंतर जेवण दिले जाते. कोविड सेंटर मध्ये केवळ तीन स्वच्छतागृह आहेत. पण त्यांची अजिबात स्वच्छता नाही. स्त्रियांसाठी वेगळ्या स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

अनेक रुग्णांची खाजगी दवाखान्यात उपचार घेण्याची परिस्थिती असताना केवळ शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेऊन सर्वजण इथे दाखल झाले. पण इथे रुग्णांची आजारातून मुक्तता करण्याऐवजी त्यांना मृत्यूच्या तोंडात ढकलले जात आहे. जळकोट तालुका हा मागास आहे. इथल्या गोरगरीब जनतेला शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहिल्याशिवाय पर्याय नाही पण प्रशासकीय यंत्रणा इथे कुठेही काम करताना दिसत नाही. 

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

कोरोनाबाधित रुग्ण डॉ. निवेदिता देवशेट्टे यांनी हा सर्व प्रकार जळकोट तहसीलदार यांच्या निदर्शनास आणुन दिला. जळकोट तहसीलदार यांनी रुग्ण डॉ. निवेदिता देवशेट्टे यांना वैयक्तिक बोला असे सांगितले. पण सर्वसामान्य व्यक्तींचे काय? त्यांचे हाल कधी थांबणार? त्यांची व्यवस्था कोण करणार? असे प्रश्न त्यांना विचारले असता त्यांनी विनाकारण आमच्याशी वाद घालु नका असे बेजबाबदार पणाचे उत्तर रुग्ण डॉ. निवेदिता देवशेट्टे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

दरम्यान रुग्णांना धीर देण्याऐवजी जळकोट तहसीलदार असे उद्धट वागत असतील तर रुग्णाचे हाल काय होतील? रुग्णांना कोविड सेंटर मधील सुविधांविषयी तहसीलदार यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळाले नाही. याबाबत डॉ. निवेदिता देवशेट्टे यांनी लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे तक्रार करुन जळकोट तालुक्यावर जातीने लक्ष घालून आवश्यक असे सुविधापूर्ण कोविड सेंटर द्यावे व इथल्या रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी केली आहे.

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 

संपादन-प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalkot Kovid center Bad condition