अंबड : राखी बांधायला बहिणीकडे निघाला; वाटेत त्याच्यावर काळानेच घाला घातला 

बाबासाहेब गोंटे 
Tuesday, 4 August 2020

रक्षाबंधनाच्या सणाला इंद्रजित आपल्या बहिणीकडे राखी बांधायला जात होता, काळानेच हा घाला घातल्याने गोलपांगरी गावावर दुखाचे सावट पसरले आहे.  

अंबड(जालना): अंबड-जालना महामार्गावरील लालवाडी फाट्यावर सोमवारी (ता.३) सायंकाळी साडे सहा वाजता कार व दुचाकी अपघात झाला. दुचाकीस्वार इंद्रजित जाधव हे जागीच ठार झाले. रक्षाबंधनाच्या सणाला इंद्रजित आपल्या बहिणीकडे राखी बांधायला जात होता, काळानेच हा घाला घातल्याने गोलपांगरी गावावर दुखाचे सावट पसरले आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार... 
याबाबत सविस्तर माहिती अशी की,  गोलपांगरी (ता. जालना) येथील युवक इंद्रजित कडूबा जाधव (३०)वर्षे हा दुपारी जालना येथून कामावरून गोलपांगरी येथे चार वाजेच्या दरम्यान घरी आला होता. गावातील आठवडी भाजीपाल्याच्या बाजार असल्याने आईला बाजार करण्यासाठी पैसे दिले. घरात पुतणीने राखी बांधली. त्यानंतर आपल्या बहिणीकडे अंबडला जात असताना शहरा लगतच असलेल्या लालवाडी फाट्यावर अंबड कडून जालण्याकडे जाणाऱ्या जीपने दुचाकीला जोराची धडक दिली. इंद्रजित जाधव जागीच गतप्राण झाला. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

बहीण भावाच्या पवित्र रक्षाबंधन सणाला बहिणीने राखी बांधण्यापूर्वीच भावावर काळाने झेप घेतली. अंबड जिल्हा उपरुग्णालयाचे डॉ. गंगावाल यांनी अंबड पोलिस ठाण्याला दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, इंद्रजित जाधव यांना मृत अवस्थेत दाखल करण्यात आले होते. यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलिस नाईक रमेश वणवे हे करत आहे. अशी माहिती ठाणे अंमलदार शहाजी पाचरने यांनी दिली आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

जीपचालकाने केले पलायन 
जीप चालकाने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक देऊन जीप अपघात स्थळावरून पुढे नेऊन पुन्हा परत वळविली होती. मात्र ही बाब रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी चालकाच्या लक्षात आल्याने त्याने जीपला दुचाकी आडवी लावली. मात्र तेवढ्यात जीपचालकाने घटनास्थळा वरून पलायन केल्याचे ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.

संपादन-प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Car and bike accident