उस्मानाबाद : उमरगा शहरात आणखी एक जण आयसोलेशन कक्षात

अविनाश काळे
रविवार, 22 मार्च 2020

परदेशातून जवळपास दहा व्यक्ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे परतल्या होत्या. त्यांच्या आरोग्याला धोका नसला तरी शनिवारी उपजिल्हा रुग्णालयात नऊ जणांना दाखल करून घेण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. या नऊ लोकांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

उस्मानाबाद : परदेशातून जवळपास दहा व्यक्ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे परतल्या होत्या. त्यांच्या आरोग्याला धोका नसला तरी शनिवारी उपजिल्हा रुग्णालयात नऊ जणांना दाखल करून घेण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. या नऊ लोकांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान रविवारी सिंगापूर येथून आलेल्या एका व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयातील आयुसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. या व्यक्तीचा स्वॅब नमुना तपासणीसाठी आज पाठविण्यात येणार आहे. शहरातील मुलींच्या शासकीय वस्तीगृहात होम क्वॉरंटाईनची सोय करण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडीत पुरी यांनी सांगितले.

चिंताजनक... राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.२२)  जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. त्याला उमरगा शहरासह तालुक्यातील नागरिकांनी प्रतिसाद देत घराच्या बाहेर पडले नाहीत. शहरात काही औषधे दुकाने वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यु असल्याने नागरिकांनी घराबाहेर येऊ नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांनी शनिवारी (ता. २१) रात्रीच केले होते.

जनता कर्फ्यमुळे रविवारी सकाळपासुन कुणीही बाहेर पडले नाही. बच्चे कंपनीना टीव्ही पाहण्यासाठी तसेच मोबाईल गेम्स, कार्टून मध्ये व्यस्त ठेवण्यात आले होते. काही मुले, मुली अभ्यासात व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले. शहरातील आरोग्यनगरीत कधी नव्हे ते निरव शांतता होती. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना साधा चहाही मिळणे कठीण झाले होते. शहराचा आठवडी बाजाराचा दिवस रविवार आहे, मात्र त्या ठिकाणी एकही व्यक्ती दिसत नव्हता. 

बसस्थानकात शुकशुकाट होता. आगाराचे प्रवेशद्वार कधी नव्हे ते बंद करण्यात आले होते. पोलिस कर्मचाऱ्यांची सारखी गस्त सुरू होती. बीट अंमलदार आपापल्या बीटमध्ये गस्त घालत नागरिकांना थोडेही रस्त्यावर येऊ देत नव्हते. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार हे शहर व परिसरात निगराणी करीत होते. पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, श्रीमती धुळे, उपनिरीक्षक अमोल मालुसरे, विजयकुमार वाघ यांच्यासह कर्मचारी दिवसभर गस्त घालत होते. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी सर्व जनतेचेही सहकार्य असणे खूप गरजेचे आहे. परंतु बाहेर देशातून आलेल्या व्यक्ती वैद्यकीय तपासणी न करता गावामध्ये प्रवेश करत आहेत व बाहेर देशातून आले असल्याची माहिती लपवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. आपले कुटुंब आणि आपल्या गावातील रहिवाशी सुरक्षित राहण्यासाठी बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींनी तत्काळ वैद्यकीय तपासणी शासकीय रुग्णालयात करावी व प्रशासनास मदत करून आपले कुटुंब आणि गावातील रहिवाशांची सुरक्षा करावी. 
-संजय पवार, तहसीलदार, उमरगा.

Janata Curfew In Osmanabad To Fight Coronavirus India Maharashtra News 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janata Curfew In Osmanabad To Fight Coronavirus India Maharashtra News