कापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा खून, नातेवाईक संतप्त! केजमधील घटना

रामदास साबळे 
Saturday, 31 October 2020

तालुक्यातील साळेगाव येथील शिवारात शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला. महिलेचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

केज (बीड) : तालुक्यातील साळेगाव येथील शिवारात शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला. महिलेचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तालुक्यातील साळेगाव अश्विनी समाधान इंगळे (वय२८) ही महिला शुक्रवारी सकाळी आपल्या दस्तगिराचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती. याच सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिचा गळ्यातील स्कार्फने गळा आवळून व दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. जीवे मारल्यानंतर प्रेत शेजारच्या कापसाच्या शेतात नेऊन टाकले होते. प्रेताजवळ दगड, स्कार्फ पडलेला असून प्रेतापासून काही अंतरावर वेचून ठेवलेला कापूस, विळा, जेवणाचा डब्बा, गुटख्याची रिकामी पुडी, पायतील एक बूट तर दुसऱ्या बाजूस काही अंतरावर कानातील एक दागिना हेअर पिन असे पडलेले आहेत. महिलेचा खून झाल्याचे समजताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मयत महिलेचे वडील सर्जेराव भीमराव सोनवणे (सारणी, ता.केज) यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने भावकीतील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आरोपींना अटक करून केज पोलीस ठाण्यात आणण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी सकाळी केज पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. मात्र घटना होऊन चोवीस तासांचा कालावधी उलटला तरी उच्चस्तरीय तपासणी होऊनही प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिल्याने शनिवारी दुपारपर्यंत प्रेत उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले होते.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा प्रकारच्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना भविष्यात घडू नयेत. यासाठी या घटनेतील आरोपींना अटक करून लवकरात-लवकर कठोर शासन करण्याच्या मागणीचे निवेदन शनिवारी सकाळी मयत महिलेचे  नातेवाइक,  साळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kage shocking news married woman Murder who went pick cotton